Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
Dhananjay Munde in beed: जनतेपासून ते प्रशासन स्तरावर उभी फूट, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि दडपण, त्यांना भयमुक्त वातावरण दिल्यासच परिणामकारक काम दिसेल - मुंडेंची अजितदादांना विनंती

बीड: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मागील पाच वर्षातील त्यांच्या चार वर्षाच्या पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडला. गेल्या पाच पैकी चार वर्षे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यात साधारण दोन ते अडीच वर्षे ही कोविडमध्ये गेली. त्या काळात रुग्णांना तातडीचे योग्य उपचार मिळवून देणे तसेच लोकांचे प्राण वाचवणे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे ही कामे प्राधान्याने करत कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. अनेक कोविड सेंटर विविध वैद्यकीय साहित्य त्याचप्रमाणे रुग्णवाहिका अशा आरोग्य यंत्रणांना बळकटी देणाऱ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीचा निधी त्याकाळी खर्च केला गेला, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिली.
बीड जिल्ह्यात राबविलेला पिक विमा पॅटर्न, विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करणे, विविध नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे, अशी अनेक कामे केली. 2024 सालचे अतिवृष्टी अनुदान मंजूर होऊन आलेले आहे, त्याचे वितरण लवकर पूर्ण केले जावे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
याच काळात जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 1100 किमी रस्त्यांच्या विकासाचे काम पूर्ण झाले. पंकजा मुंडे यांच्या पालकमंत्री कार्यकाळात मंजूर होऊन सुरू झालेले जिल्हा परिषद इमारत बांधकाम पूर्णत्वास गेले. पंकजा मुंडे यांचे पाच वर्ष व त्यापुढे मला मिळालेला 4 वर्षांचा कालावधी यात, आम्ही सर्वसमावेशक विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी कार्यालय बांधकाम सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परळी ते बीड या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. यांसह जिल्ह्यात न्यायलये, प्रशासकीय इमारती, विश्रामगृह, शासकीय रुग्णालयांच्या दर्जा उन्नती व बांधकाम असे अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे या काळात केली गेली तर अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत, कृषी भवन, महिला व बालविकास भवन, सीताफळ इस्टेट अशी अनेक मंजूर असलेली कामे आता दादांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा धनंजय मुंडेंनी व्यक्त केली. बीड जिल्हा कुणबी प्रमाणपत्र देण्यात महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे, हेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले.
बीड जिल्हा पोलिस दलास आवश्यक 73 नवीन वाहने, 113 मोटार सायकल या बाबी नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या. अशी अनेक सकारात्मक कामे करताना सर्व तालुक्यांना समान निधी देण्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. यावेळी ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारे नियोजन समितीच्या कामकाजावर मागील काही दिवसात करण्यात आलेल्या निराधार आरोपांना देखील धनंजय मुंडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
बीड जिल्हा सलोखा आणि बदनामी
दरम्यान बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही. कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही, त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी - कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.
दरम्यान काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात असून, सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांच्याकडे केली.
आणखी वाचा
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
