बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या असून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत.

बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे. एकीकडे बीडमधील (Beed) गुन्हेगारीचा वाढता आलेख समोर येत असतानाच बीडमधील गुन्हेगारीची नवनवी प्रकरणे दररोज समोर येत आहेत. बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने (Women) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, एका महिलेनं संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने आता हे प्रकरण काय असा सवाल उपस्थित झाला आहे. तर, इथेही पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या असून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये, मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या शिरुर कासार येथील खोक्याभाईच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र, एक महिना उलटला असला तरी यात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात असून पुढील प्रक्रिया केली जाते आहे.
बीडमध्ये आणखी 6 जणांवर मकोका
बीड पोलिसांनी आणखी 6 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल खेला आहे. गुन्हेगारी टोळीतील आरोपींमध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे , मुद्दसर मन्सुर पठाण , सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे केले आहेत.
बीडमधील मुकादमांवर सर्वाधिक गुन्हे
बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीचा त्रास केवळ बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास झाला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी बीड जिल्ह्यातून टोळ्या जात असतात. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या टोळ्यांच्या मुकादमांकडून ट्रक मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने फसवणूक झालेले अडीच हजार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 90% गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमांवर दाखल आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

