पुण्यात महायुतीत मिठाचा खडा, अजितदादांच्या आमदाराविरोधात भाजपने दंड थोपटले
पुण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय. कारण अजित पवार यांच्या आमदाराविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Mahayuti, पुणे : भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी केला, असा आरोप करत भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले. त्यामुळे हडपसरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार
महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे घुले यांनी सांगितले. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला. मात्र विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले (Shivraj Ghule) यांना यावेळी केला.
भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा
मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पाडलाय.
अजित पवार महायुतीत सामील झाले. वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि भाजप , शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यानंतर उलटी येते, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर सातत्याने महायुतीमधील वाद उफाळताना दिसतोय. शिवाय तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडूनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता पुण्यात भाजप कार्यकर्ते आणि अजितदादांच्या आमदारांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या