Jayant Patil Vidhan Parishad Election: जयंत पाटील कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत?
Maharashtra Politics: विधानपरिषदेत आता शेकापच्या जयंत पाटील यांचा ओळखीचा चेहरा दिसणार नाही. पाच टर्म आमदार राहिलेल्या जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना मविआकडून अपेक्षित मदत मिळालेली नाही.
![Jayant Patil Vidhan Parishad Election: जयंत पाटील कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत? How shetkari kamgar paksh Jayant Patil lost in vidhan parishad election mlc election result 2024 Jayant Patil Vidhan Parishad Election: जयंत पाटील कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/4931156ee3a12ce7674c9bcda5347b0e1720805195223954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) 9 जागांवर विजय मिळवत वरचष्मा राखला. तर एकूण तीन जागा निवडून आणण्याचे महाविकास आघाडीचे (MVA Alliance) प्रयत्न अयशस्वी ठरले. मविआला फक्त दोन जागांवरच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या रुपाने विजय मिळाला. तर शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला.
शेकापचे जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील परिचित नाव आहे. शेतकरी कामगारी पक्षाची महाराष्ट्रातील ताकद संपल्यात जमा असतानाही गेली अनेक वर्ष जयंत पाटील विधानपरिषदेवर निवडून येण्याची किमया करुन दाखवत होते. मात्र, यंदा त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली. जयंत पाटील यांना पहिल्याच पसंतीच्या मतांवर निवडून येण्याची खात्री होती. शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, उर्वरित मतांसाठी जयंत पाटील यांची मदार काँग्रेस आणि ठाकरे गटावर होती. महायुतीचे 9 आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आल्यावर 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस होती. जिंकून येण्यासाठी 23 मतांची गरज होती. परंतु, अंतिम आकडेवारीनुसार, मिलिंद नार्वेकर यांना 24.16 आणि जयंत पाटील यांना 12.46 मतं पडली. त्यामुळे नार्वेकर विजयी ठरले.
जयंत पाटलांचा घात कसा झाला?
जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. जयंत पाटील यांना 12.46 मतं पडली. हे पाहता जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत अनेक शक्यता व्यक्त करता येतात. एकतर जयंत पाटील यांना शरद पवार गटाची सर्वच्या सर्व 12 मतं पडली असतील. पण याचा अर्थ जयंत पाटील यांना माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेकापच्या आमदाराचेच मत मिळाले नाही. दुसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची 10 मतं, शेकापचे 1 आणि माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराचे मत मिळाले असावे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाची दोन मतं फुटली असावीत. तिसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची 11 आणि शेकापचे 1 अशी 12 मते जयंत पाटील यांना मिळाली असावीत. ही शक्यता गृहीत धरल्यास शरद पवार गटाचा एक आमदार फुटला असावा.
काँग्रेसकडून फक्त प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांना पहिल्या पसंतीची 25 मतं पडली. पण त्यांचे 37 आमदार आहेत. त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त 14 मतं नेमकी कशाप्रकारे वाटली गेली, हादेखील चर्चेचा विषय आहे.
ठाकरे गटाने लोकसभेच्या पराभवाचा हिशेब चुकता केला का?
रायगड जिल्ह्यात जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी ठाकरेंच्या उमेदवारांना अपेक्षित मदत केली नसल्याची चर्चा होती. त्याचाच हिशेब ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीत चुकता केल्याचे आता बोलले जात आहे.
विधानसभेत संख्या बळ नसतानाही विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले, त्याचा वचपा ठाकरे पवारांनी काढला, अशी एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोणाला किती मतं पडली?
भाजप
पंकजा मुंडे- 26
परिणय फुके-26
अमित गोरखे- 26
सदाभाऊ खोत- 23.24
योगेश टिळेकर- 26
अजित पवार राष्ट्रवादी
शिवाजीराव गर्जे - 24
राजेश विटेकर – 23
शिवसेना- (शिंदे)
भावना गवळी - 24
कृपाल तुमाने - 25
शिवसेना (उद्धव ठाकरे)
मिलिंद नार्वेकर - 24 .16
काँग्रेस
प्रज्ञा सातव- 25
जयंत पाटील- 12.46
आणखी वाचा
जयंत पाटील पराभवानंतर संतप्त, तडकाफडकी अलिबागला रवाना; म्हणाले, माझी 12 मतेच मला मिळाली!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)