Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Maharashtra Politics: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता आहे. भावेश भिंडे हा पेट्रोल पंपाचा मालक, उद्धव ठाकरेंसोबतचा फोटोवरुन भाजपचं प्रश्नचिन्ह
मुंबई: घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असणारे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याचा एक फोटो ट्विट केला. हा फोटो ट्विट करत राम कदम यांनी या दुर्घटनेसाठी एकप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार धरले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, याच मुद्द्यावरुन सध्या सरकारमध्ये असणारे छगन भुजबळ हे मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू घेताना दिसले. राज्यात आमचं सरकार आहे, मुंबई महानगरपालिकाही प्रशासकाच्या ताब्यात आहे, मग या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, असा उलटा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरील आरोपांबाबत विचारणा झाली असता म्हटले की, या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध? अनेक व्यापारी, धंदेवाईक आमच्याकडेही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येतात. आमच्यासोबत फोटो काढतात. माझ्याकडेही किती लोक येतात, त्यांना फोटोसाठी नाही बोलता येत नाही, संबंधित व्यक्ती आपला कार्यकर्ता आहे की नाही, हेदेखील लक्षात येत नाही. फोटोसाठी नाही बोलता येत नाही. त्यामुळे लगेच भावेश भिंडेसोबतच्या वक्तव्यावरुन लगेच त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध आहेत, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. या प्रकरणात आपण कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये. तो कोणाचा पेट्रोल पंप असला, कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
राम कदम नेमकं काय म्हणाले?
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी सठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर... आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?, असे राम कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट