Nashik News : शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळालं, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून काळाराम मंदिरात महाआरती
Nashik News : शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्याने काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली आहे.
Nashik News : एकीकडे आज महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव उत्साहात सुरु असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. अशातच नाशिकच्या काळाराम मंदिरात (kalaram Mandir) शिंदे गटाकडून महाआरती करण्यात आली आहे. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि शिवसेना (shivsena) नाव मिळाल्याने ही महाआरती करण्यात आली आहे. यावेळी नाशिक (Nashik) येथील शिंदे गटाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षांवर निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालाने संपूर्ण राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला गेला. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळत असून नाशिकमध्ये देखील निकालानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. तर आज सकाळी काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव आणि चिन्ह मिळाल्याच्या उत्साहात परिसरात पेढ्यांचे वाटपही केले.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली असून 2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत. शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.
निर्णयानंतर शिंदे गटाकडून जल्लोष
नाशिकमध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. आतषबाजी करत ढोल ताशा वाजवत या निर्णयाचे स्वागत करण्यात आलं. काल रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाचे संपर्क कार्यालयाबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु होता.