Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या निकालानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ आणि नाराजी झटकून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अमित शाह नाशिक दौऱ्यावर आले होते.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) दणका बसल्यानंतर आता भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकताच नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली आहे. अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता भाजप पदाधिकारी अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ आणि नाराजी झटकून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. पुढील 3 दिवसांत मंडल अध्यक्षांनी शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक घेऊन मतदार यद्यावर लक्ष केंद्रित करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले होते.
भाजप पदाधिकारी अॅक्शन मोडवर
अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर आता भाजप पदाधिकारी अॅक्शन मोडवर आले आहेत. नाशिक शहरात भाजपचे सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडका सुरू आता सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी कामाला लागले असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतानुसार A, B,C अशी प्रत्येक बूथची वर्गवारी करण्यात आली आहे. लोकसभेत मिळालेल्या मतानुसार मतदार याद्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे गाफील न राहता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपचे पदाधिकारी नव्या उमेदीने उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 40 प्लस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट
दरम्यान, नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शाह यांनी उत्तर महाराष्टातील निवडक ३० जणांसोबत बंद दाराआड चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती मिळून राज्यात 170 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 40 प्लस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य नेतृत्वाला दिले आहे. राज्यात सत्ता हवी असेल तर गटबाजी नको, नेते नव्हे, तर पक्षच सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश देतानाच निवडणूक उमेदवार नव्हे तर पक्ष लढत असतो. त्यामुळे जिथे आपला उमेदवार नसेल तेथेही पक्षाचे काम करा, असा सल्ला शहा यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना बंद दाराआड दिला आहे. जागा जिंकण्यासाठी शहा यांनी नवीन कार्यकर्ते जोडा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा, विरोधकांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढा, असा विजयाचा मंत्रही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
आणखी वाचा
Amit Shah : ठाकरे-पवारांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा; अमित शाहांच्या सूचना