Nandurbar : बदलापूरची पुनरावृत्ती नंदुरबारमध्ये! सफाई कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
Nandurbar Highschool News : नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला असून आरोपी कंत्राटी सफाई कामगारावर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : बदलापूरच्या शाळेतील घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात संताप उसळल्यानंतर आता तशाच प्रकारच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर शाळेनेही त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केलं आहे. या घटनेमुळे नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता वाढल्याचं दिसतंय.
नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये आश्लील व्हिडीओ दाखवण्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
गुन्हा नोंद, सफाई कर्मचारी ताब्यात
या घटनेविषयी सदर विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेकडून त्या सफाई कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
पालकांमध्ये असुरक्षेततेची भावना
बदलापूरसारखीच घटना घडल्यानंतर नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे अशी माहिती नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली.
एकूणच या खळबळजनक प्रकारानंतर नंदुरबारमधील शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसतंय.
गुंडाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्येचा प्रयत्न
अकोला जिल्ह्यात एका विद्यार्थिनीने एका सडकछाप गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही विद्यार्थिनी मुर्तिजापूर तालूक्यातील माना पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. ती मुर्तिजापूर येथे शिक्षणासाठी गावावरून ये-जा करीत होती.
दरम्यान, गावातीलच एका गुंडप्रवृत्तीच्या तरूणाने तिला धमकावत तिच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारावर तिला तो ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचाराची (Sexual Abuse) धमकी देत होता. अखेर या विद्यार्थिनीने त्याच्या धमक्यांना घाबरत 26 ऑगस्ट रोजी घरी किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
ही बातमी वाचा: