नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीमुळे प्रकार उघड
कोरोनाचे संकट आणि त्यामुळे सर्वांच्या वाट्याला आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक रंजक प्रेम कथा ही समोर आल्या आहेत. कोरोना काळात प्रेयसीला भेटायला मुंबईतून पायी कोकणात गेलेला प्रेमवीर आपण पाहिला होताच. मात्र, नागपुरात तर विलगीकरण केंद्रातून प्रेमाची एक भन्नाट कथा समोर आली आहे. 'तो' आणि 'ती'च्या प्रेमप्रकरणामुळे महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस सर्वच थक्क झाले आहेत.
नागपूर : नागपूरच्या सुरेंद्रनगर भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारात विलगीकरण केंद्र/क्वॉरन्टाईन सेंटर आहे. नागपुरात कोरोनामुळे क्वॉरन्टाईन होऊ लागणाऱ्या पोलिसांना याच विलगीकरण केंद्रात ठेवले जातं. शिवाय काही प्रमाणात सामान्य नागरिकांनाही इथल्या विलगीकरणात ठेवले जाते. आता याच विलगीकरण केंद्रातून प्रेमाची एक भन्नाट कथा बाहेर आली आहे.
त्याचे झाले असे की नागपूर पोलिसांच्या एका कार्यालयात एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झालं. त्यामुळे नियमाप्रमाणे त्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन होण्याची वेळ आली. पोलिसांच्या त्याच कार्यालयातील एक महिला कर्मचारीही पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांसाठीच्या विलगीकरण केंद्रात क्वॉरन्टाईन झाली. तिथे येताना तिच्यासोबत एक पुरुषही आला होता. हा पुरुष माझा नवरा असून तो सतत माझ्या संपर्कात असून त्यालाही संक्रमणाची भीती असल्याने तोही आता क्वॉरन्टाईन होणार असल्याचं तिनं सांगितलं. कुटुंबातील सदस्यांना एक खोली देण्याच्या नियमाप्रमाणे विलगीकरण केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने मानवी दृष्टीकोनातून "ती" आणि "तो" या दोघांना एकच खोली बहाल केली.
दोघांच्या विलगीकरण कालावधीतले काही दिवस आनंदात निघून गेल्यानंतर नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तिचा पती घरी परतला नसल्याची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत त्या महिलेने विलगीकरण केंद्रात महिला पोलीस शिपाईसोबत तिचा पती म्हणून राहत असलेला 'तो' पुरुष मूळात आपला पती असल्याचा दावा केला. शासकीय विलगीकरण केंद्र प्रेमीयुगुलांचा अड्डा झाला आहे का असा सवालही त्या महिलेने तिच्या तक्रारीतून विचारला होता.
ही तक्रार बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये येताच पोलीस विभागात खळबळ माजली. दुसऱ्याच्या नवऱ्याला स्वतःचा नवरा असल्याचे सांगून विलगीकरण केंद्रात त्याच्यासोबत राहणारी महिला पोलीस कर्मचारी असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत प्राथमिक चौकशी केली. तेव्हा बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणारी महिलाच विलगीकरण केंद्रात राहत असलेल्या त्याचीची खरी पत्नी असल्याचे समोर आलं. त्यामुळे खोटं सांगून एकमेकांच्या सोबतीने राहणाऱ्या 'ती' आणि 'तो'ला वेगळं करण्यात आलं.
दरम्यान, दोघे पती पत्नी नसताना दोघांनी विलगीकरण केंद्रात एकत्रित सहवास का निवडला या मागची माहिती ही रंजक आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे दोघे नागपुरात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात नोकरी करतात. मात्र, दोघांचे कार्यालय जवळजवळ आहेत. त्यातूनच एका सरकारी कॅम्पमध्ये दोघांची ओळख होऊन मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. सुरुवातीला सामान्य चॅटिंगनंतर भेटीगाठी होत दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. आता 'ती' 14 दिवस क्वॉरन्टाईन होताना दोघांनी एकमेकांचा विरह कसा सोसायचा असा प्रश्न असताना त्यावर त्यांनी शक्कल लढवली. 'ती' क्वॉरन्टाईन होत असताना 'तो' सतत तिच्या संपर्कात असल्यामुळे त्यालाही क्वॉरन्टाईन व्हावेच लागणार असे दोघांनी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याना सांगितलं. विलगीकरण केंद्रात दोघांनी पती-पत्नी असल्याचा दावा केला आणि एकत्रित खोली मिळवली.
इकडे तो चार दिवस पती घरी न परतल्यामुळे तिच्या पत्नीला काळजी वाटली. तिने माहिती घेतली असता तो विलगीकरण केंद्रात दुसऱ्याच महिलेसोबत राहत असल्याचे कळलं. मग, काय त्याच्या पत्नीने आधी विलगीकरण केंद्रात जाऊन पतीला परत पाठवण्याची मागणी केली. तिथे कोणीच तिच्या मागणीला दाद दिली नसल्यामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देत सर्व प्रकरण समोर आणलं.
आता पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण केंद्रात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पराक्रमामुळे घडलेलं हे प्रकरण समोर आल्यामुळे पोलिसांसह महापालिका आणि आरोग्य विभाग सर्वांनी सोयीस्कर मौन बाळगलं आहे. आता दोघांना वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रात पाठवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्या नुतन रेवतकर यांनी मात्र या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या संसारात दरोडा टाकण्याचा प्रकार असून महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या कृतीची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
VIDEO | क्वॉरंटाईन सेंटरवर प्यार का पंचनामा! महिला पोलीस मित्रासोबत क्वॉरंटाईन, खऱ्या पत्नीकडून चार दिवस शोध