नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती, 14 नगरसेवकांचा शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपाला मात्र लागलेली गळती थांबता थांबेना झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
![नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती, 14 नगरसेवकांचा शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश Navi Mumbai Municipal Corporation Elections BJP 14 Corporators Join Shiv Sena NCP party नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती, 14 नगरसेवकांचा शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/04202517/nmmc-navi-mumbai-municipal-corporation.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपाला मात्र लागलेली गळती थांबता थांबेना झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच आतापर्यंत 14 नगरसेवकांनी भाजपाला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या दोन महिन्यात लागण्याची शक्यता असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राज्यांत महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर आता येणाऱ्या पाच महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय तीन पक्षांनी घेतला आहे. नवी मुंबईत तर महाविकास आघाडी झाल्याचे घोषित करून विभागवार तीन पक्षांनी एकत्रित कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला सुरुवातही केली आहे.
महानगर पालिकेत तीन पक्षांची आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. गणेश नाईक समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेत 11 तर राष्ट्रवादीमध्ये 3 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.
नाईक समर्थक नगरसेवक भाजपाला सोडून महाविकास आघाडीकडे येत असले तरी ते मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असल्याचा दावा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. येत्या काही दिवसात अजून काही नगरसेवकांची घरवापसी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
भाजपाला लागलेली नगरसेवकांची गळती थांबत नसली तरी याची आपल्याला चिंता नसल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 25 वर्षात ऐन निवडणुकीत अनेक जण सोडून गेले असले तरी नवी मुंबईकरांनी आपल्याच हातात कायम सत्ता दिली आहे. त्यामुळे या ही निवडणुकीत जनतेची सात आपल्याला मिळेल असा दावा नाईकांनी केलाय.महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)