सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी, कामगारांनी घेतला मोठा निर्णय, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत
Solapur : माथाडी कामगारांनी पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. आज माथाडी कामगार माल उचलणार नाहीत.पोलिसांनी एका माथाडी कामागराशी अरेरावी करत गच्ची पकडल्याचा आरोप माथाडी कामागरांनी केला आहे.
Solapur Agricultural Produce Market Committee Onion : आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले आहेत. मात्र, यानंतर माथाडी कामगारांनी पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. आज माथाडी कामगार माल उचलणार नाहीत. आज सकाळी कांद्याचे वजन होऊन लिलाव देखील पार पडले. मात्र कांदा गाड्यात भरणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. त्यामुळं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
कांदा गाड्यात भरणार नाही, कामगारांची भूमिका
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. आज सकाळी कांद्याचे वजन होऊन लिलाव देखील पार पडले आहेत. मात्र, कांदा गाड्यात भरणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. पोलिसांनी एका माथाडी कामागराशी अरेरावी करत गच्ची पकडल्याचा आरोप माथाडी कामागरांनी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून संतप्त माथाडी कामागरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आज माल लोडींग करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहगे.
जर माथाडी कामगारांनी माल उचलला नाही तर उद्या पुन्हा लिलाव बंद राहण्याची शक्यता
दरम्यान, कांद्याचे लिलाव पार पडले असल्याने शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही, मात्र आज जर माथाडी कामगारांनी माल उचलला नाही तर उद्या पुन्हा लिलाव बंद ठेवावे लागतील, असी देखील शक्यता आहे. त्यामुळे माथाडी कामगार, बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न आम्ही करत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदार उंबरजे यांनी दिली आहे.
आज पुन्हा एकदा वादाची ठिकणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी बंद पुकारला होता. त्यामुळं काल सोलापुरात कांद्याचे लिलाव झाले नव्हते. यामुळं शेकडो ट्रक कांदा (Onion) समितीमध्येच लिलाव न होता पडून होता. यानंतर पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कामगरांमधील बैठक देखील झाला होती. बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर आज कांद्याचे लिलाव पार पडले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा वादाची ठिकणी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, लिलाव बंद होण्याची स्थिती असल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण, सोलापूर ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. अनेक ठिकाणाहून या ठिकाणी कांदा येत असतो.