
हापूस आंब्याला कोरोनापाठोपाठ तापमान वाढीचा फटका, अतिउष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फळगळ
आधी आंब्याचं फळ परिपक्व होत असतानाच कोरोना व्हायरसमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या. आता तापमानवाढीचा फटका हापूस आंब्याला बसत आहे.

सिंधुदुर्ग : फळांचा राजा असलेल्या कोकणातील हापूस आंब्याला कोरोनामुळे फटका बसलाच आहे. मात्र सध्या कोकणात तापमान वाढ होत आहे, घामाच्या धारा वाहत आहेत. किनारपट्टी भागात तर 40 ते 43 अंश सेल्सिअस तापमान गेल्या दोन दिवसांपासून असल्याचं आंबा बागायदार सांगत आहेत. त्यामुळे उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याची गळ होत आहे. परिपक्व होत असलेला आंबा गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्याचं तोंडचं पाणी पळालं आहे आहे. कातळावरील बागांना याचा अधिक फटका बसत आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका, त्यात आंब्याचं उत्पन्न एक ते दीड महिना उशिराने आलं. त्यानंतर शेतकऱ्याला काहीशी आशा होती ती आलेल्या मोहोरातून काहीतरी उत्पन्न मिळेल अशी. मात्र आंब्याचं फळ परिपक्व होत असतानाच कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाल्या. त्यानंतर आता मे महिना उजाडला मात्र कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. उष्णता वाढल्याने आंब्याना ताण बसल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे.
बदलतं वातावरण, कोरोनाचं संकट आणि आता अतिउष्णता यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं तसंच या आंबा पिकाचा विमा काढलेला असल्याने विमा कंपन्यांनी याकडे लक्ष द्यावं. या नुकसानीची पाहणी करुन विम्याच्या माध्यमातून सहकार्य करावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
कोरोनामुळे बाजारपेठ नाही. काजूचा भाव गडगडला आहे. आंबा, काजूच्या बागेतून शेतकऱ्याचं वर्षाचं गणित अवलंबून असतं. मात्र यावर्षीची आर्थिक घडी विसकटल्याने मुलांचं शिक्षण, घरखर्च यावर्षी कसा भागणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा, विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आत्महत्येचं पाऊल कोकणातील शेतकरी उचलतील, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
उष्णता वाढल्याने आंब्यामध्ये साका तयार होतो. आंब्याला डाग पडायला लागतात. मोठ्या प्रमाणात फळघळ घेते. त्यामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
