मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख आरोपींना पळून जाण्यास येथील डॉ. वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणातील प्रमुख तीन फरार आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडी पोलिसांनी चक्रे फिरवली आहे. त्यानुसार, गुरुवारी तिन्ही आरोपींचे फोटोसह परिपत्रक जारी करत आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल,असेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, सरपंच हत्याप्रकरणात एसआयटी नेमण्यात आल्यानंतर सीआयडी (CID) पथकाकडून तपासाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, आज सीआयडी पथकाने बीडमधून तिघांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक डॉक्टर आहे. या हत्याप्रकरणातील फरार तीन आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ठेवत या तिघांना पोलिसांनी उचललं असून सध्या त्यांचा तपास सुरू आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख आरोपींना पळून जाण्यास येथील डॉ. वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक डॉ. संभाजी वायबसे हे आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीना पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा संशय त्यांच्यावर आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती हाती येईल. दरम्यान, बीड हत्याप्रकरणात राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या तपासावर विशेष लक्ष देत फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तसेच, हा खटला न्यायालयात फास्टट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी हा खटला लढावा, यासाठी त्यांच्यासोबत फोनवरही संपर्क साधला आहे. दुसरीकडे या घटनेचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. वाल्मिक हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर, त्यास न्यायालयात हजर केले असता, केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वाल्मिक कराड सध्या बीडमधील तुरुंगात असून त्याच्याकडून अनेक घटनांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. सीआयडीचे तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या एसयआटीकडून हा तपास होत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरत असून बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर, परभणीही लोकं रस्त्यावर उतरले आहेत. तसेच, 5 जानेवारी रोजी पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघणार असून सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला