Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. काँगोमधील बोट दुर्घटनेचा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीला प्रवाशांनी भरलेली एक बोट धडकली. अपघातानंतर प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बोट बुडताना दिसत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे बोट बुडाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या चौकशीत हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ डेमोक्रॅटिक काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात बोट उलटल्याचा आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
इंस्टाग्राम वापरकर्ता ‘mumbai.hai.hai_‘ ने 19 डिसेंबर 2024 रोजी व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर केला आणि लिहिले की, “अलिबागहून गेट वे ऑफ इंडियाला येताना बोट उलटली.”
तपास
तपास सुरू करण्यासाठी, आम्ही या व्हिडिओचे कीफ्रेम गुगल लेन्सवर शोधले. आम्हाला हा व्हिडिओ, न्यूज एजन्सी असोसिएट प्रेसच्या यूट्यूब चॅनलवर 4 ऑक्टोबर 2024 रोजी अपलोड करण्यात आल्याचा आढळला. सोबत लिहिले होते, अनुवादित: “काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील किवू तलावामध्ये लोकांनी भरलेली बोट उलटून किमान 78 जणांचा मृत्यू झाल्याचा क्षण एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केलेल्या फुटेजमध्ये दाखवला गेला आहे”
आम्हाला चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आफ्रिका (China Global Television Network Africa) च्या यूट्यूब चॅलवर देखील व्हायरल व्हिडिओ सापडला. येथेही तो काँगोमध्ये घडलेल्या घटनेचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानंतर आम्ही मुंबई बोट अपघाताचे व्हिडिओ शोधले. आम्हाला या घटनेचे अनेक व्हिडिओ आढळले, जे व्हायरल व्हिडिओपेक्षा पूर्णपणे भिन्न होते.
अधिक माहितीसाठी आम्ही मिडडेचे वरिष्ठ रिपोर्टर समिउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ घटनास्थळाचा नाही.
हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा करून यापूर्वीही एकदा व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी देखील विश्वास न्यूजने याची चौकशी केली होती. ते फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
खोटा दावा करून व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या mumbai.hai.bhai_ या वापरकर्त्याला इंस्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक वापरकर्ते फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. काँगोमधील बोट दुर्घटनेचा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.
Claim Review : हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे बोट बुडाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Claimed By : इंस्टाग्राम वापरकर्ता ‘mumbai.hai.bhai’
Fact Check : False
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]