(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident : काळही आला अन् वेळही! पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू
पुण्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. पुणे नगर महामार्गावर कारेगावजवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
Pune Accident : पुण्यात अपघाताचं (Pune Accident) सत्र सुरुच आहे. पुणे नगर महामार्गावर कारेगाव जवळ फलकेमळा येथे मोठा अपघात झाला आहे. कंटेनर आणि कार यांची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मृत्यू झालेले चारही लोक एकाच कुटुंबातील आहे. कुटुंब मुळचं बीड (Beed) जिल्ह्यातील आहे. एका दोन वर्षाच्या मुलीसह चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सुदाम शंकर भोंडवे (वय 66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय 60), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय 32) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्विन सुदाम भोंडवे (वय 35) हे या अपघातात जखमी झाले. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून चाकणकडे चालले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली आणि स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मोटार आणि अपघातग्रस्त कंटेनर हलवल्याने वाहतूक सुरळीत झाली.
अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून सुदाम भोंडवे, सिंधुताई आणि आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाता प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
या अपघातात मृत्युमूखी पडलेले सुदाम शंकर भोंडवे हे डोमरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक असून, त्यांचे व त्यांचा मुलगा अश्विन (या अपघातातील जखमी) हे देखील पुण्यातील शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. दोघांचेही शैक्षणिक कार्यात योगदान असून, काल त्यांच्या सोनदरा गूरूकुल संस्थेतील पालक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते कुटूंबियांसह डोमरी येथे गेले होते. तेथून ते कौटुंबिक कामानिमीत्त चाकण येथे येत असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
आनंद हरपला...
सुदाम भोंडवे आणि त्यांच्या पत्नी सिंधुताई यांना चार वर्षीय नात आनंदी हिचा विशेष लळा होता. आनंदीच्या येण्याने त्यांचे घर खरोखर आनंदमय झाले होते. आनंदीच्या एका वाढदिवसाला सुदाम भोंडवे यांनी तीच्यावर एक काव्य केले होते. अश्विन यांचाही कन्येवर विशेष स्नेह होता. त्यांच्या फेसबुकवरून आज या आठवणी ताज्या झाल्या. आई - वडीलांचे छत्र आणि सहचारिणीच्या साथीबरोबरच जीवनात आनंद भरणारी चिमुकली आनंदीही त्यांना आज सोडून गेल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले.