PCMC News : बलात्काराचा गुन्हा दाखल झाला अन् त्यानं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं; घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं एकाने स्वतःला थेट पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतलं आहे.
PCMC Crime news : बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल झाल्याने एकाने स्वतःला थेट पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) ही घटना समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी (6 डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस स्टेशनमध्ये ही घटना 2 डिसेंबरच्या रात्री घडली होती. 2 ऑक्टोबरला मयत इसम 19 वर्षीय पीडितेच्या घरी गेला होता. पीडिता एकटी घरी असल्याचा त्याने गैरफायदा घेतला आणि धमकावून, बळजबरीने शरीर संबंध ठेवले, असा आरोप पीडित महिलेने केला. तसेच 20 नोव्हेंबरला पीडिता घरी एकटीच असल्याचं पाहून तो पुन्हा आला आणि 'माझ्यासोबत लग्न कर अथवा आत्तापर्यंत मी तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत कर' असं म्हणत त्याने भांडणं केलं. यावर माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू, असं पीडिता म्हणाली. त्यामुळं संबंधित व्यक्ती संतापला आणि त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारेन अशी धमकी दिली, असे आरोप करत पीडित महिलेने 1 डिसेंबरला गुन्हा दाखल केला.
बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं धक्का
हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं त्याला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून तो स्वतःला सावरू शकला नाही. यातूनच त्याने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये 2 डिसेंबरला स्वतः पेटवून घेतलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली. त्यानंतर होरपळलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला. अशातच चार दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (6 नोव्हेंबर) त्याचा मृत्यू झाला.
व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर एका व्यक्तीने स्वत:ला पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतलं. या घटनेचा सीसीटीव्हीफुडेज देखील समोर आलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलीस सखोल तपास करत आहेत. या सगळ्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्या फुटेजमध्ये व्यक्ती होरपळून पळताना दिसत आहे. पोलीस त्या व्यक्तीचा बचाव करण्यासाठी पळताना दिसत आहे.