Pandharpur : मृग नक्षत्र आगमनानंतर विठुरायाच्या चंदन उटी पूजेची समाप्ती; मंदिराला लाखोंचं उत्पन्न
Pandharpur Vitthal Mandir News : दोन वर्षानंतर झालेल्या चंदन उटी पूजांमुळे मंदिराला 28 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या चंदन उटी पूजा भाविकांना करता आल्या नव्हत्या.
Pandharpur Vitthal Mandir News : विठुराया आणि रुक्मिणी मातेला उन्हाळ्याच्या उष्मा दाह जाणवू नये म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेली चंदन उटी पूजेची आज समाप्ती झाली. दोन वर्षानंतर झालेल्या चंदन उटी पूजांमुळे मंदिराला 28 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाद यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शेवटची चंदन उटी पूजा करण्यात आली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या चंदन उटी पूजा भाविकांना करता आल्या नव्हत्या.
यवर्षीही 2 एप्रिलपासून पुन्हा या चंदन उटी पूजन सुरुवात झाली होती. विठुरायाकडे 21 हजार रुपये तर रुक्मिणी मातेकडे 9 हजार रुपये भरून भाविकांनी यंदा या पूजा केल्या. यंदा विठ्ठलाकडे 107 तर रुक्मिणी मातेकडे 65 चंदन उटी पूजा झाल्या आणि यातून मंदिराला 28 लाख 32 हजाराचे उत्पन्न मिळाले.
काल सायंकाळी शेवटची चंदन उटी पूजा झाल्यावर आजपासून या पूजा बंद झाल्या आहेत. दुपारी देवाच्या पोशाखाचा वेळी विठ्ठल रुक्मिणी मातेला चंदनाची उटी लावून या पूजा केल्या जात होत्या. शेवटच्या पूजेसाठी मंदिर समिती सदस्य शकुंतला नांदगिरे आणि ऍड माधवी निगडे यांच्यासह मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते.
रुक्मिणीमातेच्या पायावर वज्रलेपन करण्याची तारीख 11 जून रोजी ठरणार
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची धक्कादायक रितीने झालेल्या झीज प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. त्यांनतर आता पंढरपुराच्या मंदिरातील रुक्मिणीमातेच्या पायावर वज्रलेपन करण्याची तारीख 11 जून रोजी होणाऱ्या मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार आहे. रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचे वास्तव ABP माझा ने समोर आणल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिराची पाहणी केली होती. आता त्यांनी आषाढीपूर्वी मूर्तीवर लेपन करण्याची तयारी दाखवली असून नेमके कधी हे लेपन करायचे याचा निर्णय 11 जून रोजी होणाऱ्या मंदिर समिती बैठकीत होणार आहे.