Nagpur Accident: ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे RTO अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन; कारच्या स्पीड बाबत माहिती समोर
Nagpur Audi Car Accident : नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात मोठी बातमी समोर आली आहे. अपघातात ज्या ऑडी कारने हा अपघात केला त्या कारची आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केले आहे.
Nagpur Accident नागपूर: नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात (Nagpur Audi Car Hit and Run Case) मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरच्या रामदासपेठेतील अपघातात ज्या ऑडी कारने हा अपघात केला त्या कारची आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केले आहे. आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या अपघात घडवणाऱ्या ऑडी कारचे इन्स्पेक्शन केले आहे. अपघातावेळी ऑडी कार अत्यंत तीव्र गतीमध्ये होती, असा आरोप महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी लावला होता. त्या अनुषंगाने ही आरटीओ अधिकाऱ्यांनी ऑडी कार ची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे.
तर एबीपी माझा ने त्यांना या इन्स्पेक्शन मध्ये नेमकं काय आढळलं याबद्दल आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी कार प्रचंड वेगात असल्याचे आरोप फेटाळून लावत यात फार तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
तपासणीनुसार ऑडी कार ची गती 60 किमीच्या सुमारास
अपघाताच्या वेळेला वाहनाची गती खूप नसावी, आमच्या तपासणीनुसार ऑडी कार ची गती 60 किमीच्या सुमारास असेल. कारण ऑडी कारमध्ये जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे त्याच्या आधारावर त्याची गती अपघाताच्या वेळेला 60 च्या जवळपास होती असं दिसून येत आहे. शिवाय अपघात होऊनही गाडीचे एअरबॅग उघडलेले नाही. जेव्हा छोटा इम्पॅक्ट असतो तेव्हाच एअरबॅग उघडले जात नाही. अन्यथा याचे एअरबॅग उघडले गेले असते. अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गाडीवर नंबर प्लेट का नव्हती?
गाडीवर नंबर प्लेट का नव्हती? यावर बोलताना पोलिसांनी सांगितलं की, कोराडीमधून आम्ही गाडी ताब्यात घेतली. तेव्हा गाडीवर नंबर प्लेट लागलेली होती. पोलीस स्टेशनमध्ये गाडी आणली तेव्हाही नंबर प्लेट लागलेली होती. मात्र, नंबर प्लेट अपघातामुळे लूज झालेली होती. ती पडू नये, गहाळ होऊ नये, म्हणून नंबर प्लेट काढून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे. नंबर प्लेट आम्ही जप्त केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
अपघातावेळी गाडी चालवणाऱ्याचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं समोर
ऑडी कारचा अपघात होऊन दोन इतर कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी एकदा महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. अशी माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागली आहे. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जितेंद्र हावरे हे गेले काही वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात आता काँग्रेस कनेक्शन उघड झाले असून या अपघातातील सर्वपक्षीय मैत्री असल्याचेही पुढे आले आहे.
हे ही वाचा