Kolhapur News : मध आणि रेशीम उद्योगामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर करण्यासाठी नाबार्ड सर्वतोपरी सहकार्य करेल
मध आणि रेशीम उद्योगामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवण्यासाठी नाबार्डच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव यांनी व्यक्त केला.
Kolhapur News : मध आणि रेशीम उद्योगामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवण्यासाठी तसेच या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत बँकांद्वारे कमी दरात वित्त पुरवठा होण्यासाठी नाबार्डच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव यांनी दिली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, नाबार्ड व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधपाळ शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षण’ कार्यशाळेचे उद्घाटन अंबिका नगर येथील ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर येथे आज करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, मध संचालनालयाचे (महाबळेश्वर) संचालक दिग्विजय पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण अनुसंधानचे राजेंद्र आटपाडीकर व महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी आदी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, मध आणि रेशीम उद्योगातून अधिकाधिक शेतकरी स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे. मधपाल शेतकरी प्रशिक्षणाप्रमाणेच अन्य तांत्रिक प्रशिक्षण सत्र नियमित आयोजित होण्यासाठी नाबार्ड प्रयत्न करेल.
मध संचालनालयाचे संचालक पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मधमाशा पालन उद्योगात अग्रेसर आहे. देशातील पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातील मांगर असून दुसरे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राज्यात साधारण 5 लाख मधपेट्यांची आवश्यकता आहे, पण त्या तुलनेत केवळ हजारोंच्या संख्येनेच मधपेट्या तयार होत आहेत. ही गरज भागवण्यासाठी मधमाशा पालन उद्योगाला चालना देणे गरजेचे आहे. मधुमित्र संकल्पनेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे. अळीम रोगामुळे व अन्य कारणांनी मधमाशांचा मृत्यू होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, मधमाशा पालन उद्योगासमोरील छोट्या छोट्या समस्या दूर करण्यात मधुमित्रांची भूमिका महत्वपूर्ण आहे.
मधमाशांची वसाहत नष्ट न करता पोळ्यातून मध काढण्याच्या पद्धतीबद्दलही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यात मधमाशा पालन उद्योगासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य केले जाते. मधुकेंद्र योजनेचा लाभ घेवून अधिकाधिक नागरिकांनी मधमाशा पालन उद्योग निर्मिती करावी.
संदेश जोशी म्हणाले, खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि नाबार्डच्या सहकार्याने मधमाशी मित्र हा देशातील पहिला उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. या कार्यशाळेतून अधिकाधिक मधुमित्र तयार व्हावेत. जेणेकरुन शास्त्रोक्त पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमित्रांचे जाळे तयार होईल. बऱ्याच ठिकाणी पेस्ट कंट्रोलद्वारे पोळे हटवले जाते, पण यामुळे मधमाशा नष्ट होतात. या कार्यशाळेत शास्त्रोक्त पद्धतीने पोळे काढण्याच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनामुळे सर्पमित्रच्या धर्तीवर मधमाशी मित्रांचे जाळे जिल्ह्यात तयार होईल.
प्रशिक्षणार्थींच्या वतीने मोहन कदम म्हणाले, मधमाशांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. मधमाशा जगविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. जिल्हाधिकारी रेखावार यांच्या संकल्पनेतून आग्या मधमाशांचं जतन व संवर्धन, मधाचं गाव, मधुमित्र या संकल्पना राबवण्यात येत आहेत. मध आणि मेण प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात सुरु होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या