(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar : नाशिकमध्ये वातावरण तापलं, राष्ट्रवादीचं अब्दुल सत्तारांना जोडो मारो आंदोलन
Abdul Sattar : नाशिक (Nashik) शहरातील राष्ट्रवादी भवनसह भगूर परिसरात अब्दुल सत्तारांचा निषेध करण्यात आला.
Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नाशिकच्या (Nashik) राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवनसह भगूर परिसरात हा निषेध केला. सत्तारांच्या फोटोला काळं फासत जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवी दिल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये तर सत्तारांचे कार्यालय फोडण्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या अपशब्दाबाबत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'निम का पत्ता कडवा है, अब्दुल सत्तार *** है'. '50 खोके, एकदम ओके' या घोषणांसह अब्दुल सत्तारांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिंदे सरकार मधील गद्दार कृषीमंत्री अब्दुल सत्तार याने आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
“महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करण्याचे बाळकडू आहे. ५० खोके घेतलेले राज्याचे गद्दार जर महिलांचा अवमान करत असतील तर त्यांच्या खोक्यांसह त्यांची तिरडी या राज्यातून काढल्याशिवाय आम्ही महिला रहाणार नाही “ असे वक्तव्य या वेळी प्रेरणा बलकवडे यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधीकाऱ्यांनी सत्तारांच्या फोटोला जोडे मारुन काळे फासले व प्रतिकात्मक तिरडी काढली.
अनेक स्तरावरून सत्तारांची कानउघाडणी
दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर राज्यभरातून अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठली आहे. सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी या विधानाबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असून माफी मागितल्याचे समजते आहे.