(Source: Poll of Polls)
Nashik News : पाणी नाही, कर्मचारी नाही? शौचालय स्वच्छ करणार कोण? नाशिकची सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा गुंडाळली
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेची सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
Nashik News : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून सेल्फी विथ टॉयलेट (Selfi With Toilet) ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली. मात्र शिक्षकांसह शाळांमधून विरोध करण्यात आल्याने ही स्पर्धा गुंडाळण्याची वेळ नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या शिक्षण (Nashik ZP) विभागावर आली आहे. आता शिक्षण विभागाकडून सुधारित आदेशाद्वारे इतर स्पर्धा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने तसेच युनिसेफ (UNISEF) आणि सीवायडीए यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोज करण्यात आले होते. आजच्याच दिवशी या स्पर्धांचा निकाल देखील घोषित केला जाणार आहे. मात्र स्पर्धांमधील सेल्फी विथ टॉयलेट ही स्पर्धा वादात सापडली. जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षकांकडून या स्पर्धेला विरोध होत होता. अखेर शिक्षण विभागाने ही स्पर्धाच रद्द केली आहे.
दरम्यान राज्यभरात जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ शौचालय अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अभियानातुन शाळांमधील शौचालयांची स्वच्छता करून त्यासोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरवातीपासूनच शाळांसह शिक्षकांनी या स्पर्धेला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाला सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा रद्द करावी लागली. आता सेल्फी स्पर्धेव्यतिरिक्त इतर स्पर्धा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. यासंबंधीचे सुधारित आदेश शुध्दीपत्राद्वारे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी काढले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने हा उपक्रम रद्द केला खरा मात्र या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न समोर आले आहेत.
टॉयलेट स्वच्छ करायचे कोणी?
एकीकडे सेल्फी विथ स्पर्धा आयोजित केल्यापासून शिक्षकांचा विरोध होता. अनेक शाळांमध्ये पाण्याची सोया नाही. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई पद नसते. मग शौचालये स्वच्छ करायचे कोणी? असा सवाल शाळा, शिक्षकांकडून उपस्थित केला जात होता. याचबरोबर मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे. अनेक शाळांमध्ये शौचालयांची दुरावस्था झालेली आहे. महिला शिक्षक आणि विद्यार्थींनी यांना टॉयलेट वापरता येत नाही. अनेक ठिकाणी तर टॉयलेटची व्यवस्थाच नाही. काही शिक्षकांनी तर गुरुजींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर ही स्पर्धाच रद्द करण्यात आली.
पथनाट्य, चित्रकला स्पर्धां उपक्रमांचे आयोजन
आता शिक्षण विभागाकडून सुधारित आदेशाद्वारे सर्व शाळा व गाव पातळीवर पथनाट्य स्पर्धा (विषय : माझी शाळा माझे शौचालय, शौचालय वापरण्याच्या योग्य पध्दती व मलमुत्र व्यवस्थापन) तसेच चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा (विषय : माझी शाळा, सुरक्षित शौचालय, शौचालय वापरण्याच्या योग्य व आरोग्यदायी पध्दती, स्वच्छ गाव सुंदर गांव, माझ्या स्वप्नातील निर्मल ग्राम) हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता 4 थी ते 10 वीच्या मुलामुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन स्पर्धांचा निकाल आज शाळा स्तरावर घोषित करण्यात येणार आहे.