Dugarwadi : नाशिककरांसह पर्यटकांसाठी महत्वाची सूचना! दुगारवाडीसह हरिहर गडावर जायला बंदी, हे आहेत नियम?
Dugarwadi : नाशिकजवळील दुगारवाडीसह हरिहर किल्ल्यावर वीकेण्डला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
Nashik Dugarwadi : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात फारसा चांगला पाऊस नसला तरी रिपरिप पावसामुळे (Nashik Rain) पर्यटनस्थळे निसर्गसौंदर्याने बहरली आहेत. त्यामुळे नाशिककरांसह पर्यटकांची पाऊले त्र्यंबक परिसरात (Trimbakeshwer) वळू लागली आहेत. मात्र चार दिवसांपूर्वी दुगारवाडी धबधब्यात तरुण वाहून गेल्याची घटना घडली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुगारवाडीसह हरिहर किल्ल्यावर वीकेण्डला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
त्र्यंबकजवळील दुगारवाडी (Dugarwadi Waterfall) धबधबा नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरला आहे. मात्र मागील वर्षी अनेक पर्यटक धबधब्यात अडकून पडले होते. यंदा एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग अलर्ट झाला असून, वीकेण्डला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे. त्याचबरोबर मद्यपान करण्यासह ते बाळगणे, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान पावसाची रिपरिप सुरु असल्याने त्र्यंबकेश्वर परिसर हिरवाईने नटला आहे. हरिहरगडासह दुगारवाडी आणि नेकलेस धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. वीकेण्डला होणारी गर्दी तसेच पावसाच्या संततधारेमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच दुगारवाडी येथे युवक बुडाल्याच्या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात आहे. पावसाळी पर्यटनासह त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. हरिहरगडासह दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटकांचे ट्रॅफिक जाम होते. त्या पार्श्वभूमीवर वीकेण्डला हरिहरगडावर जाण्यासाठी, तर दुगारवाडी धबधब्याजवळ खाली जाण्यासाठी दुपारी तीननंतर मनाई असणार आहे. त्यामुळे गडावरुन उतरणाऱ्या आणि धबधब्याजवळूनवर चढणाऱ्या पर्यटकांची गर्दी होणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीकेण्डला दुपारनंतर प्रवेश मनाईचा निर्णय
तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गडावर ही पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन तैनात व वन कर्मचाऱ्यांना निर्बंधांबाबत सूचना दिल्या आहेत. विशेषत: वीकेण्डला पर्यटकांचे गर्दी झाल्यास गडावर प्रवेश नाकारला जाईल, असे नाशिकहून परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले. तर वीकेण्डला हरिहरगड आणि दुगारवाडीला पर्यटकांची गर्दी होत असून वन कर्मचाऱ्यांसह स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे सदस्य नियंत्रणासाठी नियुक्त केले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीकेण्डला दुपारनंतर प्रवेश मनाईचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दिला आहे.
पर्यटकांना सूचना
शनिवार आणि रविवार रोजी तीन वाजेनंतर हरिहर किल्ल्यासह दुगारवाडी धबधब्यावर प्रवेश बंदी राहिल. धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई करण्यात आली आहे. धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मज्जाव, तसेच गाणी वाजवणारे, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर, मद्यपान करण्यासह ते बाळगणे, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जंगल क्षेत्रासह गड-किल्ल्यांवर रात्री मुक्कामास बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :