भरवशाचा नोकरच बेभरवशाचा निघाला! संधी मिळताच असे काही केलं, मालकाला धक्काच बसला
Aurangabad Crime: व्यापाऱ्याच्या घरातून दहा लाखांचे तब्बल वीस तोळे दागिने लंपास केल्याचे समोर आले.
Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये एका चोरीच्या घटनेत चक्क घरात कामाला असलेला नोकरच आरोपी निघाल्याचं समोर आले आहे. मागील चार वर्षांपासून कारवर चालक म्हणून असलेला नोकर विश्वासू वाटत होता. मात्र, तोच बेभरवशाचा निघाल्याने मालकाला धक्काच बसला आहे. कारण या नोकराने संधी मिळेल तसे व्यापाऱ्याच्या घरातून दहा लाखांचे तब्बल वीस तोळे दागिने लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना जिव्हेश्वर कॉलनी येथे उघडकीस आली असून, पुंडलिक मुळे (रा. विजयनगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतराम कोंडिबा वाळके (59, रा. जिव्हेश्वर कॉलनी, साखरे मंगल कार्यालयाजवळ) हे व्यापारी आहेत. दरम्यान 10 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजता त्यांची सून माहेरहून घरी आली. ती दागिने कपाटात ठेवण्यासाठी गेली. तेव्हा कपाटात आधीपासून ठेवलेले दागिने आढळले नाहीत. त्यांनी विचारपूस केल्यावर मागील पाच महिन्यांपासून हे दागिने कोणीही पाहिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे वाळके यांनी पोलिसात धाव घेतली.
नोकरावर आला संशय....
दरम्यान प्रकरण पोलिसात गेल्यावर गेल्या पाच महिन्यांत कोणीही आपल्या घरी नवीन आलेले नाही, असे वाळके यांच्या बोलण्यातून समोर आले. त्यामुळे कार चालविण्यासाठी नोकर म्हणून ठेवलेला पुंडलिक मुळे याच्यावर संशय निर्माण झाला. मुळे हा मागील चार वर्षांपासून काम करीत असल्याने विश्वासू म्हणून घरातही जात होता. त्याला घरातील बारीकसारीक माहिती होती. कपाटाची चावी कोठे ठेवतात, हेही त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने संधी साधून कपाटातील दागिने लंपास केल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतेले.
पोलिसांनी ताब्यात घेताच दिली चोरीची कबुली....
जिन्सी पोलिसांनी संशयित पुंडलिक मुळे याला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. तर मुळे याने सात तोळ्यांचा गजरी हार, तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, आठ तोळ्यांचा नेकलेस, आठ ग्रॅमच्या बांगड्या, एक तोळ्याची चेन, अर्धा ग्रॅमचे सोन्याचे पॅडल, दहा भाराचे चांदीचे चेन, दोन ग्रॅमची अंगठी, चांदीचे कडे, असे दहा लाख चार हजार 400 रुपयांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मुळे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बँकेत खाते नसल्याने घरात खड्डा करून त्यात रोख रक्कमेसह सोनं ठेवलं; पण रात्री असे काही घडले...