बँकेत खाते नसल्याने घरात खड्डा करून त्यात रोख रक्कमेसह सोनं ठेवलं; पण रात्री असे काही घडले...
Aurangabad : खड्डा खोदून एका डब्यातील चार किलो चांदी व चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड पळवली.
Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या नायगाव येथे सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या घरावर मध्यरात्री दोनच्या सुमारास धाडसी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बँकेत खाते नसल्याने घरात खड्डा करून त्यात ठेवलेल्या चार किलो चांदी आणि चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड देखील दरोडखोरांनी लंपास केली आहे. कालू महारिया सेनानी असे चोरी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुभाष यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे मध्यप्रदेशातील कालू पावरा हे आपल्या कुटुंबासह शेतात बांधलेल्या एका छोट्या घरात राहतात. रविवारी रात्री दोन खोल्यांत कालू यांची दोन मुले आणि दोन मुली झोपले होते. तर पती, पत्नी दोघे बाहेर बाजेवर झोपले होते. दरम्यान मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी प्रथम घराचा वीजपुरवठा खंडित केला. तसेच अंधाराचा फायदा घेत कालू यांच्या एकवीस वर्षीय मुलगा वेरसिंग याला नावाने आवाज देऊन उठविले. त्याने घराचा दरवाजा उघडला असता दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.
यावेळी वेरसिंग यास चाकूचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक केली. कालू पावरा यांच्या कुटुबान घरात खड्डा खोदून एका डब्यात चार किलो चांदी व चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड ठेवली होती. दरोडेखोरांनी धमकावून खड्ड्यात ठेवलेला चांदीचा डबा व रक्कम बाहेर काढायला लावली. त्यानंतर दागिने आणि पैसे घेऊन आरोपी फरार झाले.
घटनास्थळी श्वानपथक
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. तसेच श्वानपथक बोलवण्यात आले, श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र पुढे हे दरोडेखोर वाहनामधून पसार झाले असावेत त्यामुळे श्वानाला पुढचा मार्गे दाखवता आला नाही. तसेच फिंगरप्रिंट पथकाला देखील यावेळी पाचारण करण्यात आले होते.
ओळखीच्या व्यक्तीचा सहभाग...
कालू पवारसह त्यांच्या चारही मुलांनी दिवस रात्र मजुरीचे काम केले. गेल्या सात वर्षांपासून पै पै जमा केला होता. या पैशातून चार किलो चांदी खरेदी केली होती. बँकेत कोणाचेही खाते नसल्याने रोकड चार लाख पन्नास हजार रुपये देखील घरात खड्डा करून एका डब्यात ही चांदी व रक्कम ठेवली होती. कोणालाही संशय येवू नये यासाठी संसारोपयोगी सामान त्या जागेवर ठेवण्यात आले होते. मात्र चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना याबाबत माहिती होती, त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीचा या दरोड्यात सहभाग असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.