बार्शी तिथं सरशी! विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'चा दरवळ, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बार्शीचा पुन्हा डंका
यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केलीय. यामध्ये बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे
मुंबई : चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केलीय. यामध्ये बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात नागराज मंजुळेंनंतर राष्ट्रीय पुरस्काराची माळच लागली आहे. त्यात बार्शी तालुक्याने मोलाची भर घातलीय.
विनोदच्या 'कस्तुरी'चा दरवळ
इंजिनियरिंग सोडून आवड जपण्यासाठी चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या विनोद कांबळेनं पुन्हा एकदा बार्शीचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवलं आहे. विनोद कांबळे लिखित आणि दिग्दर्शित कस्तुरी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनोदनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टमार्टम करणाऱ्या एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट असलेल्या कस्तुरीचा दरवळ आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधीही कस्तुरी सिनेमानं देशासह जगभरातील काही महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता त्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व स्थानिक कलाकार आहेत.
संघर्षातून पुढे येत पुरस्कारावर कोरलं नाव
विनोद कांबळेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुरस्कारापर्यंत प्रवास केलाय. विनोद कांबळेची घरची परिस्थिती बेताची. विनोदचे वडील आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यात इंजिनियरिंग सोडून त्याने चित्रपटाची आवड असल्याने मार्ग अवलंबला. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. विनोदने म्होरक्या या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमासाठी देखील सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
विठ्ठल काळेंच्या काजरो चित्रपटालाही पुरस्कार
बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र असलेल्या विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या काजरो या कोकणी चित्रपटास यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठल काळे यांनी याआधी अनेक हिंदी, मराठी सिनेमांसह काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे पानगावसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी अमर देवकरांची हवा
गेल्या वर्षी बार्शीचेच युवा लेखक आणि दिग्दर्शक अमर देवकर यांच्या म्होरक्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. हा पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने देवकर चर्चेत आले होते. त्यांनी पोस्टमनच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारला होता. देवकर यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन बनवलेल्या म्होरक्याची अनेक फेस्टिव्हलमध्ये जोरदार चर्चा झाली. मात्र बॉक्स ऑफिसवर मात्र प्रेक्षकांनी म्होरक्याकडे पाठ फिरवली. देवकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या सिनेमाची निर्मिती केली होती.