(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramesh Chennithala: सांगलीच्या जागेवरून मविआत रस्सीखेच कायम; महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला स्पष्टच बोलले, म्हणाले....
सांगलीच्या जागेबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मोठे भाष्य केले असून सांगलीच्या जागे बद्दलचा तिढा आज किंवा उद्या सुटेल, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केलाय.
Sangli Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये(Maha Vikas Aghadi Seat Sharing) सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच चढाओढ सुरू असून रोज अनेक दावे-प्रतीदावे करण्यात येत आहे. अशातच या जागेबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी मोठे भाष्य केले असून सांगलीच्या जागे बद्दलचा तिढा आज किंवा उद्या सुटेल, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केलाय. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) किंवा इंडिया अलायंसमध्ये प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या जागेवर आपला दावा सांगत असतो. मात्र त्याबाबत योग्य ती चर्चा करून हा प्रश्न मार्गी काढल्या जात असतो. त्यामुळे सांगलीच्या जागेबद्दल आज किंवा उद्या हा प्रश्न सुटलेला असेल, असा विश्वासही रमेश चेन्नीथला यांनी बोलताना व्यक्त केलाय. चेन्नीथला हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते आज नागपूर (Nagpur) विमनतळावर आले असता त्यांनी हे भाष्य केलंय.
काँग्रेसकडे चहा पाजण्यासाठी देखील पैसे नाही
विदर्भ हा काँग्रेसचा गड असून या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचंड प्रभाव आहे. जनता भाजपच्या विरोधात असून केंद्रीय सरकारच्या विरोधात त्यांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ही नाराजी मतदारांच्या मताच्या रूपाने व्यक्त होईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी बोलताना व्यक्त केलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार जिंकतील, असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेसचे बँक अकाउंट सील झाल्याने आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस कशा पद्धतीने लढवणार, याबाबत बोलताना रमेश चेन्नीथला यांनी मोठे विधान केलं असून काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना चहा पाजण्यासाठी देखील पैसे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी आमचा या देशातील नागरिकांवर पूर्ण विश्वास असून तेच आम्हाला देशाच्या या लढाईत पैसे देणार असल्याचेही ते म्हणाले.
जनतेचा सहारा घेऊनच आम्ही पूर्ण ताकतीनिशी ही आगामी निवडणूक लढवणार आहोत आणि आमचा मोठ्या मताधिक्याने विजयी देखील होणार आहे. आमचे मुख्य टारगेट हे भाजपचा पराभव करणे हा असून देशाच्या हक्काची ही लढाई आम्ही लढत आहे. राहुल गांधी यांनी जो विश्वास या देशातील नागरिकांमध्ये निर्माण केलाय, त्यामध्ये भारत जोडो, नागरिकांना न्याय देणे हा विश्वास आम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी देशात इंडिया अलायन्सची सत्ता आम्हाला प्रस्थापित करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही जनतेची लढाई लढत असल्याचेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
विदर्भ काँग्रेसचा गड
नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्या विरोधात ही निवडणूक लढणार असून ते अतिशय मजबूत आणि भविष्यातील विजयी उमेदवार आहेत. विकास ठाकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, हे चित्र आपल्याला येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि इतर काही पक्ष मिळून मजबूत संघटन तयार झाले आहे. त्यामुळे आम्ही जिंकण्याच्या उद्देशाने एकमेकांकडे सीट शेअर करत असतो.
आमचा मुख्य उद्देश हा देशाला वाचवणे असून भाजपचा पराभव करणे हा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधील प्रत्येक उमेदवार हा एका पक्षाचा उमेदवार नसून तो या संघटनेचा उमेदवार असल्याची आमची भावना आहे. सध्या घडीला भाजप आणि मोदी सरकार घाबरलेले असून ते अनेक आरोप करत आहेत. मात्र त्यात फार काही तथ्य नाही. देशात महाविकास आघाडीला मोठे समर्थन मिळत असून आगामी काळामध्ये आमचाच विजय होईल, असा विश्वासही रमेश चेन्नीथला यांनी बोलताना व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या