Sinhagad Fort :पर्यटकांनो काळजी घ्या! सिंहगडावर बिबट्याचा वावर; कोणत्या गावात वावरतोय बिबट्या?
पुण्यातील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या सिंहगडावर सिंहगडाच्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आणि वर्षाविहारासाठी जाताना आता पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
Sinhagad Fort : पुण्यातील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या सिंहगडाच्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आणि वर्षाविहारासाठी जाताना आता पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत. मोरदरी गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर हा परिसर प्रामुख्याने बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मात्र आता बिबट्या पुण्याच्या वेशीवर आल्याने चिंतेत भर पडली आहे.
यापूर्वीदेखील सिंहगडाच्या परिसरात अनेकदा बिबट्या आढळून आला आहे. गडावर जाणाऱ्या पर्यटकांना यापूर्वी अनेकदा बिबट्याचं दर्शन झालं आहे. सिंहगड परिसर हा दाट जंगलाचा परिसर आहे. या ठिकाणी अनेक वन्य प्राणी अस्तित्वात आहेत. त्यात हिंस्त्र प्राणी देखील आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. वनविभागालाही सांगण्यात आलं आहे. वनविभागाकडूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण
पावसाळ्यात पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्यात सिंहगड, लोहगड, कोरीगड, कोकणकडा, कुंडमळा, शिवनेरी अशा अनेक किल्ल्यांवर पर्यटक मोठी गर्दी करतात. याच परिसरातील काही भागाला बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे प्रत्येक गडावर बिबट्या प्रवण क्षेत्र नावाने बोर्ड लावण्यात आले आहेत. बोर्ड लावण्यात आले असले तरीही ते क्षेत्र सोडून अनेक भागात बिबट्यांचा मुक्तसंचार दिसतो. त्यामुळे सिंहगड किंवा कोणताही ट्रेक करताना आता नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातच नाईट ट्रेक करणाऱ्यांंनादेखील धोका निर्माण झाला आहे.
ट्रेक करताना कोणती काळजी घ्याल?
- एकट्याने ट्रेकिंगला जाण्यापेक्षा एखाद्या संस्थेतून किंवा ग्रुपसोबत जाणे केव्हाही चांगले.
- ट्रेकिंग गाईड सर्व ट्रेकिंग उपकरणे पुरवत असल्याची खात्री करा.
- ट्रेक करताना लवकर वाळणारे कपडे घाला.
- शक्यतो ट्रेकिंग शूज घाला.
- तुमचे गॅझेट पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 2 मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जा.
- रेन कोट बाळगायला विसरू नका.
- ट्रेकिंग दरम्यान हायड्रेटेड रहा.
- नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगामुळे वाहून जाण्याचा धोका असतो.
- फोटो काढण्यासाठी डोंगराच्या बाजूला किंवा तलावाजवळ जोखमीची पोझेस देऊ नका त्यामुळे तोल जाण्याची भीती असते.
हेही वाचा-
Thane: अंबरनाथमधील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू; 30 ऑगस्टपर्यंत पर्यटन क्षेत्रांवर जाण्यास मनाई