Thane: अंबरनाथमधील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू; 30 ऑगस्टपर्यंत पर्यटन क्षेत्रांवर जाण्यास मनाई
Thane: अंबरनाथ पर्यटन क्षेत्रांवर 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पावसाळी पर्यटनामुळे वाढत असलेल्या जीवितहानींमुळे हा निर्णय घेण्यात आला.
Ambernath Tourist Spots Closed: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर (Tourist Spots) मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू राहतील, अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.
अंबरनाथमधील पर्यटनस्थळांवर 30 ऑगस्टपर्यंत बंदी
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर (Kondeshwar), भोज धरण (Bhoj Dam), बारवी नदी (Barvi River), चिखलोली (Chikhloli) अशी जवळपास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकसाठी येत असतात. मात्र इथे आल्यानंतर पाण्याचा अंदाज न येणं, मद्यपान करुन पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेकांचे अपघात होत असतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 30 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.
गोव्याजवळील दूधसागर धबधब्यावरही पर्यटकांना बंदी
चेन्नई एक्स्प्रेस सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहायला जाण्यास रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे. परिसरात चांगला पाऊस झाल्याने धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाला आहे. शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येत असतात. पण रेल्वे खातं आणि वन-खात्याने धबधब्याकडे जाण्यास बंदी घातली आहे आणि यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. शनिवारी (15 जुलै) काही उत्साही तरुणांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण रेल्वे पोलिसांनी त्यांना रोखून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. दूधसागर धबधबा परिसरात पूर्वी काही अपघात घडून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पालघरमधील पर्यटनस्थळांवर तीन दिवसांत तिघांचा बुडून मृत्यू
पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवरही मनाई आदेश लावले असताना देखील काही अतिउत्साही पर्यटक थेट आपला जीव धोक्यात घालत आहेत. पालघर जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे चांगलेच प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांवर सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मागील दोन दिवसांत पालघरमधील विविध निसर्गरम्य ठिकाणांवर तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असतानाही साहसी पर्यटक जीव धोक्यात घालवून धबधब्यांवर जात आहेत. त्यामुळे आता अशा प्रवाहित झालेल्या धबधब्यांवर जीवरक्षकांची (Life Guard) नेमणूक करुन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा:
Shravan 2023: आजपासून अधिक श्रावण महिन्यास प्रारंभ; अधिक मासात काय केलं पाहिजे? जाणून घ्या...