Kolhapur Bypoll Result : महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना डिवचले, पोटनिवडणूक निकालानंतर झळकले 'हे' पोस्टर
Kolhapur Bypoll Result Chandrakant Patil : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पोस्टर लावून डिवचले आहे.
Kolhapur Bypoll Result : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजपचा पराभव झाल्यास हिमालयात जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांना त्याच वक्तव्यावरून डिवचले आहे. शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांचे 'हिमालय की गोद मे' असे नमूद पोस्टर झळकावले आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोर लावला होता. महाविकास आघाडीवर भाजपकडून आरोप करण्यात येत होते. महाविकास आघाडीकडूनही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी पुण्यातून निवडून गेले असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर कोल्हापूरमधील ही पोटनिवडणूक जिंकू अथवा हिमालयात जाऊ , हे आव्हान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत म्हटले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर पोटनिवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी 'हिमालय की गोद मे' असं नमूद करत चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर झळकावले. युवक काँग्रेसनेदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोस्टर झळकावले. चंद्रकांत पाटील हिमालयात फरार झाले असल्याचे पोस्टर युवक काँग्रेसने झळकावले.
महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. जयश्री जाधव यांना 96226 मते तर, भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना 77426 मते मिळाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Pune Chandrakant Patil Banner : 'हरवले आहेत', 'दादा परत या'; कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांचे बॅनर