Rajiv Satav Health | काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक, सायटोमॅगीलो विषाणूचा संसर्ग, आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती
काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झालेले काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजीव सातव यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

जालना : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला आहे. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली आहे. मात्र, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव कोरोनामुक्त झाले होते. परंतु, सातव यांना सायटोमॅगीलो Cytomegalovirus (CMV) या नवीन विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज दुपारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जहांगीर रुग्णालयात जाणार आहेत.
कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्याचबरोबर ते आता व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना काही दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टरांनी म्हटलं होतं.
मात्र, सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असं वाटत असतानाच ती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राजीव सातव यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेत आहेत.
19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र, 25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. परंतु 19 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवान निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं वाटत असतानाच पुन्हा प्रकृती खालावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
