Buldhana News : पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या आदिवासी पाड्यातील निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली; निकृष्ट बांधकाम उघड
Buldhana News : शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी निर्माणाधीन पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीनदोस्त झालीय. ही घटना बुलढाण्याच्या आदिवासी बहुल असलेल्या चिचारी या गावात घडली आहे.
Buldhana News बुलढाणा : शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी निर्माणाधीन पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीनदोस्त झालीय. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या चिचारी या गावात घडली आहे. आदिवासी बहुल असलेल्या या भागात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य (Water Crisis) असताना ही पाण्याची टाकी वरदान ठरणार होती. मात्र, निकृष्ट बांधकाम असल्याने ही पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीनदोस्त झाल्याने नागरिकांमध्ये रोष उमटताना दिसत आहे.
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी या निकृष्ट दर्जाच्या असून या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करून 24 तासात यातील दोषींवर कारवाई करावी. असे न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांनी दिला आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. जवळ जवळ या टाकीचे काम पूर्ण झाले होते. मात्र अलिकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने या टाकीच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल करण्यात आली आहे. अवघ्या 5 महिन्यात ही टाकी कोसळल्याने या टाकीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ही पाण्याची टाकी आज अचानक कोसळल्याने परिसरात एकच आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. परिणामी, कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
गौरखेडा गावात गडुळ पाणीपुरवठा, ग्रामस्थांचा संताप
अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईपलाईनचे काम एक वर्षापासून प्रलंबित होते. पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरु झाले. मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे दिसून येत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलीन पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाची दिसून येत आहे. गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईन मधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याचे पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिक चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत. यावेळी अनेकदा गावकऱ्यांनी पाईप लाईन संदर्भात अनेकवेळा तक्रार सुद्धा केली. मात्र त्यावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या