IND vs PAK, T20 World Cup 2022 : मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानला अस्मान दाखवताच कोल्हापूरच्या शिवाजी चौकात अभूतपूर्व जल्लोष!
फाॅर्म हा काही काळासाठी असला, तरी क्लास हा चिरंतन असतो, हे किंग कोहलीने दाखवताना टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले. टीम इंडियाने पाकिस्तानला अस्मान दाखवत टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी शुभारंभ केला.

IND vs PAK, T20 World Cup 2022 : फाॅर्म हा काही काळासाठी असला, तरी क्लास हा चिरंतन असतो, हे किंग कोहलीने दाखवताना टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले. त्याच्या कारकिर्दीतील अविस्मणीय नाबाद 82 धावांच्या खेळीने टीम इंडियाने पाकिस्तानला अस्मान दाखवत टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी शुभारंभ केला. 160 धावांचा पाठलाग करताना एकवेळ 4 बाद 26 अशी नाजूक अवस्था झालेली असताना कोहली आणि हार्दिक पांड्याने 5 व्या विकेटसाठी113 धावांची भागिदारी करत विजय सुनिश्चित केला.
कोल्हापूरमध्ये शिवाजी चौकात आतषबाजी
या विजयानंतर देशभरासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोल्हापुरातील शिवाजी चौकात टीम इंडियाने पाकिस्तानला दिलेला दणका असूदे किंवा अन्य मोठ्या स्पर्धांमधील विजय असू दे समस्त कोल्हापूरकर एकत्र येऊन जल्लोष करत आतषबाजी करणे हे समीकरण आहे. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने विजय खेचून आणताच कोल्हापूर शहरातील प्रत्येक गल्लीला जत्रेचे स्वरुप आले. शेकडो क्रिकेटप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 26 अशी झाली होती, पण कोहली आणि पांड्याने काही षटके संयमाने खेळून काढली. 10 व्या षटकांनंतर दोघांनी आक्रमण करत ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. भारताला शेवटच्या षटकांत 16 धावांची आवश्यकता असतानाच पहिल्याच चेंडूवर पांड्या बाद झाल्याने भारतावर दबाव आणखी वाढला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्रिझवर आलेल्या कार्तिकने एक धाव घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा घेतल्या. पहिल्या तीन चेंडूत तीनच धावा घेतल्याने भारतावर चांगलेच दडपण वाढले होते. मात्र, चौथ्या चेंडूवर विराटने डीप स्क्वेअरमधून सिक्स ठोकला आणि तो नो बाॅल सुद्धा ठरला. त्यामुळे भारताला सात धावा मिळाल्या. त्यामुळे तीन चेंडूत 6 असे समीकरण झाले. त्यानंतर पुढील वाईड बाॅल झाला. फ्रीट हिटच्या चेंडूवर तीन धावा घेतल्याने शेवटच्या दोन चेंडूत दोन धावा हव्या असतानाच पाचव्या चेंडूवर कार्तिक बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर दोन धावा असताना आर. अश्विनने स्टम्पमागील चेंडू संयमाने सोडून दिल्याने पुन्हा एक वाईड झाला आणि सामना बरोबरीत झाला. अखेर शेवटच्या चेंडूवर अश्विनने एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयानंतर विराट काय म्हणाला?
विजयाचा शिल्पकार कोहली म्हणाला की, माझ्याकडे शब्द नाहीत, हे कसे घडले याची कल्पना नाही. शब्दात वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. शेवटपर्यंत टिकून राहिल्यास आपण जिंकू शकतो, असा विश्वास हार्दिकला होता. जेव्हा शाहीनने पॅव्हेलियनच्या टोकावरून गोलंदाजी केली, तेव्हाच आम्ही त्याच्यावर प्रहार करण्याचा निर्णय घेतला. हॅरिस हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे आणि मी ते दोन षटकार मारले. हिशोब साधा होता. नवाजला एक षटक टाकायचे होते, त्यामुळे मी हॅरिसला ठोकल्यास तर ते घाबरणार हे निश्चित होते. त्यामुळे 8 मध्ये 28 वरून सरळ 6 चेंडूत 16 पर्यंत समीकरण खाली आले. आजपर्यंत मोहालीमधील माझी ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम खेळी होती. आज मी याला उच्च मानतो. हार्दिक विश्वास देत राहिला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
