राज ठाकरेंच्या विरोधातील आंदोलन अंगलट, हॉटेलमध्ये घुसत राडा केल्याप्रकरणी 11 तरुणांवर गुन्हे दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (५ ऑगस्ट) धाराशिव शहरात आले होते. सोलापूरात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जाब विचारण्यासाठी हे आंदोलक गेले होते

Raj Thackeray: धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंविरोधात हॉटेलमध्ये घूसत राडा घालणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज ठाकरेंना आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलक गेले होते. धाराशिवच्या आंनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (५ ऑगस्ट) धाराशिव शहरात आले होते. सोलापूरात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जाब विचारण्यासाठी हे आंदोलक गेले होते. राज ठाकरेंची भेट न झाल्याने या आंदोलकांनी थेट हॉटेलमध्ये घुसत राडा घातला होता. त्याबाबत कलम 189 (2)323,126 सह महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली होती. चर्चा झाल्यानंतर अखेर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना भेटीची वेळ मागितील. मात्र, आंदोलकांना वेळ नाकारण्यात आली. धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली. बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये 10 मिनीटे चर्चा झाली.
मराठा आंदोलकांनी कोणते प्रश्न विचारले?
तुम्ही आरक्षणाबाबत आज वक्तव्य केलं. मात्र आत्तापर्यंत आरक्षणासाठी आमचे 400 बांधव याच्यामध्ये मयत झाले. आण्णासाहेब पाटलांपासून आत्तापर्यंत अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. आम्हाला कोण भडकवतं नाही. आज आमचा समाज कोणत्या अवस्थेत जगतोय आम्हाला माहिती आहे, अशा परिस्थितीत तुम्ही माथी भडकवली जातात, किंवा आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य करणे चुकीचे होते. आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सध्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार आहात?
बैठक पार पडल्यानंतर मराठा आंदोलक काय म्हणाले?
मराठा आंदोलक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी जरांगेची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करतो म्हणाले. त्यामुळे आम्ही तात्पुरते हे आंदोलन स्थगित करतोय. राज ठाकरेंच्या पुढच्या भूमिकेनंतर आम्ही आमची भूमिका ठरवू. मनसे समर्थक काही पेजेस वरून दोन कार्यकर्त्यांचे फोटो वायरल करत हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे म्हटले जातेय. त्यावर देखील या कार्यकर्त्याने स्पष्टकरण दिलं असून आम्ही कुठल्याही पक्षाचे नाहीत,असं म्हटलंय.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
