राज्यमंत्री बच्चू कडूंनी अकोल्यात वीरमातापित्यांचे धुतले पाय, झाले पंगतीतले 'वाढपी'
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या कुटुबियांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. शहीदांच्या कुटूंबियांसाठी चांदीच्या ताटात 'शाहीभोजना'चं आयोजन बच्चू कडू यांनी केलं.
अकोला : अकोल्यातील 'ग्रीनलँड हॉटेल'चं सभागृह आज पार भारावून गेलेलं. एरव्ही या सभागृहानं अनेक सोहळे पाहिलेत अन् अनुभवलेही. परंतु, आजचा सोहळा सर्वार्थाने पार वेगळा. भावना, संवेदना, अभिमान अन् आपुलकीच्या भावनांनी ओथंबलेला. ज्यांच्यासाठी हा हृद्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपला मुलगा, पती, वडील या देशासाठी अर्पण केलेला. या अनोख्या सन्मानानं आपल्या काळजाच्या तुकड्यांच्या 'शहीदत्वा'चा आज परत नव्यानं त्यांना अभिमान वाटला. तर ज्यांच्यामुळे आपण खरं स्वातंत्र्य उपभोगत, अनुभवत आहोत, त्यांच्या कुटूंबियांची अल्पशी सेवा करता आली, असा तृप्त सेवाभाव आयोजक असलेल्या त्या नेत्यातील कार्यकर्त्याला सुखावून गेला होता.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटूंबियांचा अनोखा सन्मान केला. बच्चू कडू यांनी वीरमातांचे पाय धुतलेत. चांदीच्या ताटात या कुटूंबियांना शाही भोजन दिलंय. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च 'वाढपी'ही झाले होते.
स्वातंत्र्यदिनी शहीदांच्या कुटूंबियांसाठी बच्चू कडूंचा 'शाही भोज' :
बच्चू कडू... सध्या राज्याच्या शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार अशा अनेक खात्यांचे राज्यमंत्री. मात्र, बच्चू कडू यांची याआधी आणखी एक ओळख आहे. ही ओळख आहे 'आंदोलक नेता', 'फायरब्रँड लोकप्रतिनिधी' आणि 'संवेदनशील माणूस' अशी. आज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील याच संवेदनशील अन् हळव्या माणसाचं अकोला जिल्ह्यातील शहीदांच्या कुटूंबियांना परत एकदा दर्शन झालं आहे.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासून बच्चू कडूंचे शासकीय कार्यक्रम होतेय. मात्र, दुपारी ग्रीनलँड हॉटेल सभागृहात पालकमंत्री बच्चू कडूंमधलं एक वेगळं रूप पहायला मिळालं. हे रूप होतं शहीदांच्या कुटूंबियांचे पाय धुत कृतज्ञता व्यक्त करणारा 'कार्यकर्ता', त्यांच्या पंगतीत अगदी प्रेम अन् आग्रहानं वाढणारा 'वाढपी' अन् त्यांना प्रेमानं घास भरविणारा 'मुलगा'. 'ग्रीनलँड हॉटेल' सभागृहातलं आजचं सारं वातावरणच भावूकतेच्या हळव्या क्षणांनी भारावलेले. पाट, पाटावर सजवलेलं चांदीचं ताट, ताटातले पंच-पक्वान्नं, आग्रहानं वाढणारे मंत्री अन जिल्हाधिकारी. अन कार्यक्रमानंतर आपुलकीनं वीर माता-पित्यांना दिलेली शाल अन साडी-चोळी. या अनोख्या सन्मानानं या कुटूबियांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. या कार्यक्रमात 28 शहीदांच्या कुटूंबियांना बोलविण्यात आलं होतंय. पालकमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च वैयक्तिक आपल्या खिशातून केला आहे. यावर्षीपासून पुढे मंत्री असलो किंवा नसलो तरी प्रत्येक स्वातंत्र्य दिनी अकोल्यात हा उपक्रम राबविणार असल्याचं बच्चू कडू यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलं.
वीरमातांचे धुतले पाय :
राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीच मंत्रीपदाचे 'प्रोटोकॉल' झुगारत सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळतात. आजच्याही कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडूंनी आपल्या मंत्रीपदाची 'झुल' अन् 'प्रोटोकॉल' बाजूला सारलेत. कारण, या संपुर्ण कार्यक्रमात त्यांची भूमिका होती ती यजमानांची. त्यांच्यासोबत असलेल्या अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी या कार्यक्रमात अगदी सामान्यपणे यजमानांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच बच्चू कडू यांनी वीरमातांचे चौरंगावर पाय धुतलेत. यावेळी या वीरमातांच्या भावना अनावर झाल्यात. आपल्या शहीद मुलामुळे राज्याचा एक मंत्री आपले धूत आपला सन्मान करीत असताना त्या आपल्या शहीद वीरपुत्राच्या आठवणींनी व्याकूळ झाल्यात.
बच्चू कडू झालेत पंगतीतले 'वाढपी'. वीरमातांना भरवला प्रेमानं 'घास' :
आजच्या या कार्यक्रमासाठी बच्चू कडूंनी शहीदांच्या कुटूंबियांसाठी सारी व्यवस्थाच अगदी 'शाही' प्रकारची ठेवली होती. पाट, लोड, तक्के अन् समोर ताटासाठी ठेवलेला पाट. चांदीच्या ताटात पंच-पक्वानांची रेलचेल असं सारं काही 'हटके'च. वीर शहीदांच्या कुटूबियांच्या या पंगतीत बच्चू कडू हे चक्क वाढण्याच्या भूमिकेत होते. त्यांनी अतिशय आग्रह करीत या परिवारांना आग्रह केला. यातील काही वीरमातांना जेंव्हा बच्चू कडू यांनी घास भरवला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वहायला लागलेत. या संपुर्ण आयोजन अन सन्मानानं ही शहीद जवानांच्या कुटूंब अगदी नि:शब्द होती.
'रक्तदान' आणि 'रूग्णसेवा' ही बच्चू कडूंची ओळख :
बच्चू कडू विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून 2019 मध्ये चौथ्यांदा विधानसभेवर विजयी झाले आहेत. 1999 मध्ये अपक्ष म्हणून अचलपूरमधून अत्यल्प मतांनी पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुढच्या चार निवडणुकांमध्ये तब्बल चारदा दणदणीत विजय प्राप्त केला आहे. त्याआधी त्यांनी रक्तदान शिबीरं आणि रूग्णसेवेतून संपूर्ण जिल्हाभरात ओळख निर्माण केली. अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त गरीब रूग्णांवर मुंबईत मोफत उपचार करवून घेतलेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या राजकारणाचा पाया याच दोन गोष्टींतून घातला गेला. मंत्रिपदाचं ग्लॅमर आल्यानंतरही त्यांच्यातील संवेदनशील माणूस अन् कार्यकर्ता अगदी तसाच असल्याचा प्रत्यय आजच्या या उपक्रमातून पहायला मिळाला आहे.
शहीदांच्या बलिदानावरच आपल्या देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, अभिमान आणि ओळख टिकून आहे. समाजानंही या शहीदांच्या कुटूंबियांना सन्मान देणारे असे उपक्रम राबवित त्यांच्या देशभक्तीला सलाम करावा, हिच माफक अपेक्षा.