आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीने रोटी घाट पार केला असता!
कोरोनामुळे यंदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. यावर्षी आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज तुकोबांच्या पालखीने वळणदार रोटी घाट पार केला असता आणि माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले गेले असते.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज तुकोबांच्या पालखीने वळणदार रोटी घाट पार केला असता आणि माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले गेले असते.
टाळ मृदुंग वीणा घेऊन हाती ! रोटीचा अवघड घाट चडुनी..
प्रथेप्रमाणे आज आषाढी वारी निघाली असती तर संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी रोटी घाट पार केला असता. आज सकाळीच तुकोबांच्या पालखी सोहळ्याने पाटसमार्गे उंडवडी सुपेकडे प्रस्थान ठेवले असते. जगद्गुरु तुकोबांची पालखी आज गावात येणार म्हणून सकाळपासूनच कुंडलीमध्ये पालखीच्या स्वागतासाठी गावकरी सज्ज राहिले असते. या गावात यापूर्वी ज्या ज्या वेळी पालखी यायची त्या वेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलं विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांच्या देशांमध्ये पालखीचं स्वागत करायचे.
रोटी घाट पार करताना वारकऱ्यांच्या डोक्यावर आभाळ भरुन आलेले असायचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात नाचत-गात जाणाऱ्या वाऱ्यावर, वरुण राजा हजेरी लावत असायचा. तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गुंजखीळा आणि खराडेवाडी परिसरातील लोक रस्त्यावर गर्दी करत असायचे पालखी सोहळ्यातील मानकरी आणि वारकऱ्यांचे रांगोळी काढून स्वागत केले जायचे.
सकाळी सहा वाजता तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर साडेसात ते आठच्या दरम्यान पालखी उंडवडी सुपे येथे पालखी तळावर दाखल झालेली असायची. तुकोबांच्या पालखी मार्गातील आजचा मुक्कामाचा टप्पा हा तब्बल 25 किलोमीटरचा असायचा. याच मार्गामध्ये वळणदार असा रोटी घाट पार करण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने जमा झालेले असायचे.
दोन ते अडीच किलोमीटरचा वळणदार घाट चढून जाताना वारकऱ्यांमध्ये आणखीनच उत्साह संचारला असायचा. फारसा उंच हा घाट नसला तरी वळणदार असल्यामुळे तुकोबांच्या पालखीला दुसऱ्या चार बैल जोड्या लावून हा घाट पार केला जायचा. तसा या परिसरामध्ये पाऊस कमी पडत असला तरी थोडाफार पावसाच्या शिडकाव्याने रोटी घाट हिरवा गार दिसायचा. रोटी घाटात येताच नेकलेस व्ह्यूव वारकऱ्यांनी तयार केलेला बघण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध सकाळपासूनच डोंगरावर जागा धरुन बसायचे.
रोटी घाट पार करुन वर आलेले वारकरी रोटी गावाच्या हद्दीमध्ये थोडावेळ विसावायाचे आणि लगेच पुढे उंडवडीला मुक्कामाला जाण्यासाठी चालत राहायचे.
उंडवडी गावामध्ये वारकऱ्यांना बेसन भाकरीचा बेत ठरलेला असायचा. गावातील प्रत्येक घरांमध्ये भाकरी तयार करुन त्या एका ठिकाणी जमा करण्याची प्रथा या गावांमध्ये अनेक वर्षापासून चालू आहे. आज वारकरी आपल्या गावात येणार म्हणून म्हणून गावातील प्रत्येक जण सण साजरा करायचा. यंदा इतिहासात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रद्द झाल्याने पालखी सोहळ्याचे स्वागत आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावकरी मुकणार आहेत.
उंडवडीचे पत्रकार विजय मोरे सांगत होते की, "जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात पहिला मुक्काम हा उंडवडी सुपे येथे असायचा. गावकऱ्यांची अनेक वर्षांपासू पिठलं भाकरीची परंपरा कायम होती. वारकरी मागील अनेक ठिकाणी गोड भोजन घेतल्यानंतर उंडवडीकरांच्या पिठलं भाकरीचा स्वाद मोठ्या आनंदाने घ्यायचे. उंडवडीकरांसाठी तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि वारकरी म्हणजे जणू वर्षातील एक मोठा सण उत्सव असायचा. त्यामुळे आठ दिवस अगोदरच पालखीकडे डोळे लावलेले गावकरी दिसायचे. यंदा मात्र कोरोनामुळे गावकरी पालखी सोगळ्यातील सेवेला मुकणार असल्याने लोकांमध्ये दुख असल्याचे जाणवत आहे"
जर आषाढ वारी निघाली असती तर आज माऊलींच्या पादुकांना निरास्नान घातले गेले असते..
नीरा भिंवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला असता. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी सकाळी नऊ वाजेपर्यंत न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावले असते. माऊलीची पालखी आपल्या गावात येणार म्हणून पिंपरे गावच्या ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या धुमधडाक्यात मध्ये स्वागत केलं असतं. याच ठिकाणी पालखी अर्धा तास थांबली असती आणि पुढे निरेकडे मार्गस्थ झाली असती.
यावर्षी प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आठवडाभराचा पुणे जिल्ह्यातील प्रवास पालखी सोहळ्यातील वारकर्यांनी पूर्ण केला असता आणि आज हा सगळा सोहळा सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचला असता. हा पालखी सोहळा हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी हा सोहळा मार्गस्थ झाला असता.
आषाढी वारी दरम्यान माऊलींच्या पादुकांना तीन वेळा स्नान घातले जाते. याचे सगळ्यात पहिले स्नान हे आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर नीरा नदीवर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते आणि तिथून पुढे शेवटचे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे.
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर नीरा नदीवरच्या जुन्या ब्रिटीशकालीन पुलावरुन मंद गारवा अंगावर घेत, नगारखान्याची बैलगाडी..दोन अश्व..टाळकरी..झेंडेधारी..भगवी पताका खांद्यावर घेतलेले वारकरी अशा वैभव लवाजजम्यासह दत्तघाटावर आला असते. दुपारी बारा वाजेपर्यंत माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर ती स्नान घातले गेले असते. हा सोहळा पाहण्यासाठी नीरा गावच्या पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच नीरा काठी जमायला सुरु झालेले असायचे. दत्त घाटावर तर इतकी गर्दी व्हायची की ऐनवेळी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची जागा बदलावी लागायची.
माऊलींचा पालखी सोहळा नीरेला पोहोचेपर्यंत मोठा पावसाला सुरुवात झालेली असायची. नीरा स्नान आणि वारकऱ्यांसाठी नीरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडले जायचे. नीरा नदीवरच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या कडावर जिकडे पाहावे तिकडे फक्त वारकरी पाहायला मिळायचे. नीरा तीरावर हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ अरफळकर आणि सोहळा प्रमुखांच्या हातात विश्वस्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुका दिल्या गेल्या असत्या. माऊली माऊलीच्या गगनभेदी जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना भक्तीमय वातावरणात शाहीस्नान घालण्यात आले असते. शाही स्नान पार पडल्यानंतर नीरा नदीच्या काठावरच सातारा जिल्हा प्रवेशाची कमान लागते आणि इथून पुढे हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचला असता.
क्रमशः
यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे
आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज वाल्मिकी ऋषींच्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा राहिल्या असत्या!