आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी.. | आज अवघड दिवे घाट पार केला असता!
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज लाखो वारकऱ्यांनी अवघड दिवे घाट पार केला असता. त्यामुळे यंदा आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज लाखो वारकऱ्यांनी अवघड दिवे घाट पार केला असता.
देहूतून तुकोबांची पालखी निघाल्यानंतर ती पुण्यात पोहोचते आणि माऊलींची पालखी सुद्धा एकाच वेळी पुण्यामध्ये दाखल होत असते. पालखी मार्गातील सर्वात मोठे शहर म्हणजे पुणे. विशेष म्हणजे माऊली आणि तुकोबांच्या पालखी यांचा दोन दिवस मुक्काम हा पुण्यामध्ये असतो.
पुणे शहरामध्ये ज्या चौकामध्ये माऊली आणि तुकोबांचे वारकरी एकत्र येतात, वारकऱ्यांचं जंगी स्वागत जिथे होतं तो चौक म्हणजे संगम वाडीचा ब्रिज. दरवर्षी याच संगमवाडी ब्रिजवर दिवसभर पुणेकर आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करायचे आहे. माऊली आणि तुकोबांची पालखी ज्या रस्त्यावरुन पुण्यामध्ये दाखल होते, त्या प्रत्येक रस्त्यावरती रांगोळी काढलेल्या असायच्या ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने अवघे पुण्यभूमी दुमदुमून निघायची.
पुण्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना तर प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची जणू पर्वणीच मिळालेली असायची. शनिवार वाड्यापासून पर्वती असो की सारसबाग सगळीकडेच खांद्यावर भगवा पताका घेतलेली वारकरी पाहायला मिळायचे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असं वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळायचं. कुणी या वारकऱ्यांना गोड-धोड जेवायला करायचं तर कुणी रस्त्यावर स्टॉल मांडून फराळाचे पदार्थ वारकऱ्यांना देण्याचा बेत आखायचे.
यावर्षीची आषाढी वारी आता आपल्या दारी येणार नाही म्हणून पुणेकरांमध्ये कायम हुरहूर लागून राहिली आहे. कोरोनाचं संकट इतकं वाढलं आहे की मागच्या तीन महिन्यापासून पुण्यातील आप्त इष्ट मित्रांना देखील भेटायला जिथे या मंडळींना सवड मिळाली नाही, तिथे वारकऱ्यांच्या भेटी गाठी घेणं शक्यच नव्हतं. पालख्या पुण्यात पोहोचल्या की जणू सणाचे वातावरण प्रत्येक घरांमध्ये पाहायला मिळायचं. लहान बच्चेकंपनी वारकऱ्यांच्या पेहरावामध्ये दिसायचे तर महिला आणि पुरुष सुद्धा मराठमोळ्या पोषाखामध्ये पालखीच्या दर्शनासाठी अक्षरश: रांगा लावायचे.
पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असायचा. कारण या पालखी मार्गातील एकूण अंतर हे सगळ्यात जास्त चालून जाण्याचा अंतर आहे. पुणे ते सासवड मार्ग दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून वारकरी सोपानकाकाच्या सासवडमध्ये मुक्कामी थांबत असत.
पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी प्रस्थान ठेवते. त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती होते. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचते. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करत असायचे. आजच्या दिवशी तर एकादशी आली आहे, त्यामुळे याच हडपसर मार्गावर पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केले असते.
इकडे तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोर साठी प्रस्थान ठेवलं असतं. आता पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात. त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरीमार्गे पंढरपूरकडे कूच करतेय तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहोचत असते.
हडपसरहून निघालेल्या माऊली महाराजांच्या पालखीसोबत एव्हाना वरुणराजाने हजेरी लावलेली असायचे. कारण दिवेघाट पार करणाऱ्या या वारकऱ्यांच्या अंगावर पावसाचे दोन चार थेंब पडले नाहीत अशी वारी या वारकऱ्यांना कधीच आठवत नाही. पुणे ते सासवड तब्बल 35 किलोमीटरचा अंतर कापून जात असताना याच रस्त्यात लागतो, तो हा तब्बल साडेचार किलोमीटरचा वळणदार दिवे घाट..
वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत पुण्यामधले तरुण-तरुणी अनेक नोकरदार आणि गृहिणी सुद्धा दिवेघाटात साडेचार किलोमीटर अंतर चालत असतात. वारीच्या वाटेवर सेल्फी आणि फोटोच्या क्लिक जेवढ्या दिवे घाटामध्ये मिळत असतील, कदाचित तेवढ्या संपूर्ण वारीच्या वाटेवर कधीच पाहायला मिळत नसायच्या. 70-80 वर्षाच्या वृद्ध वारकऱ्यांसोबत फुगडी खेळताना त्यांच्यासोबत ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषावर चालताना पुण्यातील तरुणाई अक्षरशः देहभान विसरुन जायची.
आजच्या दिवशी माऊलींच्या पालखीचे एकूण चार विसावे असायचे. हडपसर सोडल्यानंतर वडकी नाला इथे दुपारचा विसावा झाला की पालखी दिवे घाट चढण्यासाठी सज्ज व्हायची. एरवी या पालखीला केवळ दोनच बैलजोडी हा रथ ओढायचं काम करायच्या, आता मात्र हा अवघड दिवे घाट पार करण्यासाठी कधी सहा तर कधी आठ बैल जोड्या लावून अवघड घाट पार करावा लागायचा.
साधारण दुपारी अडीच तीन वाजता हा अवघड दिवे घाट सर करायला पालखी सुरु करत. असे तसे वारकरी तर सकाळपासूनच या घाटातून पुढे सासवडला चालत जात असतात. वळणदार घाट आणि सोबत वरुण राजाची हजेरी यामुळे या दिवेघाटातील वातावरण निसर्ग रम्य आणि प्रसन्न वाटायचं. दिवे घाट म्हणजे हौशी फोटोग्राफरसाठी जणू पर्वणीच असायची. कारण एकूण वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची छबी टिपावी आणि त्यात निसर्गाने साद घालावी असे दृश्य दुसरीकडे कुठेच बघायला मिळत नाही.
मी आतापर्यंत एकूण चार वेळा याच दिवे घाटातून वारीचं वार्तांकन केलं आहे. सकाळपासूनच आम्ही झेंडेवाडीच्या विसाव्या जवळ रिपोर्टिंग करण्यासाठी थांबून असायचो. कारण या संपूर्ण घाटामध्ये हे एकमेव ठिकाण आसायचं जिथं मोबाईलला थोडी तरी रेंज मिळायची. मला न चुकता या गोष्टीचं कुतूहल वाटायचं की ज्यांचं वय 60..70..80 वर्ष आहे अशी माणसं सुद्धा हा अवघड दिवे घाट कसा काय पार करत असतील?
मागच्या वर्षी एका 85 वर्षाच्या आजोबाला मी हाच प्रश्न विचारला होता की बाबा तुम्हाला रक्तदाब किंवा मधुमेह आहे का? तर त्यावर त्या आजोबांनी उत्तर दिलं होतं की, हो मी घरी असताना रोज न चुकता त्याच्या गोळ्या खातो, मात्र ज्या वेळी वारीच्या वाटेला लागलो की मी आषाढी होईपर्यंत कधीच गोळ्यांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. वयाची सत्तरी ओलांडलेला वारकरी ज्यावेळी जमिनीपासून दोन अडीच फूट उंच उडी मारुन ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोष करायचा त्या वेळी मात्र हा वारकरी आणि विठ्ठलाच्या अलोकिक भक्तीचा जणू मिलाप बघायला मिळायचा.
अवघड दिवे घाट चढताना या वारकऱ्यांचे शरीर थकत असेल पण यांचं मन अधिकच प्रसन्न होताना मी कायम या दिवे घाटामध्ये पाहत आलो आहे.
चार साडेचार वाजता माऊलींची पालखी ही सासवड नगरीमध्ये प्रवेश करायची याच ठिकाणी पुणे ग्रामीण प्रशासनाकडून पालखीचे जंगी स्वागत व्हायचं आणि सगळ्यात शेवटचा पालखीचा विसावा हा झेंडेवाडीच्या विसाव्यावर व्हायचा. आता माऊलींची पालखी की सोपानकाकांच्या सासवडमध्ये विसावणार आहे. पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर सासवडमध्ये सुद्धा वारकऱ्यांना दोन दिवस मुक्कामासाठी मिळतात आणि तिथून पुढे हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करत असतो.
क्रमशः
मागच्या वर्षी वारी कशी होती? आषाढी वारी | आषढवारीची दृश्यं आकाशातून | माझा विठ्ठल माझी वारी | दिवे घाट | ABP Majha