(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज वाल्मिकी ऋषींच्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा राहिल्या असत्या!
कोरोनामुळे यंदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. यावर्षी आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींची पालखीने मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीनंतर जेजुरीहून प्रस्थान ठेवले असते. वाल्मिकी ऋषींची संजीवन समाधी असलेल्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा करुन माऊलींच्या पालखीचे जंगी स्वागत झाले असते.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींची पालखीने मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीनंतर जेजुरीहून प्रस्थान ठेवले असते. वाल्मिकी ऋषींची संजीवन समाधी असलेल्या वाल्ह्यात घरावर गुढ्या उभा करुन माऊलींच्या पालखीचे जंगी स्वागत झाले असते.
मल्हारी मार्तंड खंडेरायाचा निरोप घेऊन आज माऊलीच्या पालखीने जेजुरीमधून वाल्हेसाठी प्रस्थान ठेवले असते. खरंतर जेजुरीच्या पालखीतळावर ज्यावेळेस माऊलींची पालखी पोहोचायची त्यावेळेस पाऊसाला सुरुवात झालेली असायची. त्यामुळे पालखी तळाच्या बाजूला वारकऱ्यांना मुक्कामासाठी मोठी कसरत करावी लागायची. पुण्यातून पालखी सोहळा बाहेर पडत असताना आणि सासवड आणि जेजुरीमध्ये पोहोचत असताना वारकऱ्यांना ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळायचा. मात्र एकदा जेजुरी सोडली की मग मात्र मोठ्या पावसाला सुरुवात झालेली असायची.
आता पालखी सोहळा निघून आठवडा उलटून गेलेला असायचा. सुरुवातीला आळंदीहून निघणाऱ्या पालख्या त्यासोबतचे वारकरी हे जस जसे इतर गावाला पोहोचायचे तिथं मुक्काम करायचे. त्या परिसरातील अनेक लोक या वारीमध्ये सहभागी व्हायचे त्यामुळे आळंदीहून सुरु झालेला हा वैष्णवांचा मेळा मजल-दरमजल करत वाढताना पाहायला मिळत असे.
पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा समाज जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. एव्हाना दरवर्षी शेतामध्ये पेरणीची लगबग चालू असायची. अनेक वेळा तर पाऊस पेरणीच्या वेळेला हुलकावणी द्यायचा आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं टाकायचं. शेतातील पेरणी अगोदर करायची की भगवा पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये निघायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये बळीराजा अडकायचा. मग पावसाची वाट बघताना अनेक वेळा आळंदी देहूतून पालख्या मार्गस्थ झालेल्या असायच्या. अनेक जण मशागतीचे कामे आटोपून पेरणी कुटुंबीयाकडे सोपवून वारीत जायचे खरे पण वरीतून क्षणभर विश्रांती मिळाली की शेतकऱ्यांचे डोळे आपल्या शेतावरचे आभाळाकडं लागायचे.
ज्या वारकऱ्यांना पेरणी केल्याशिवाय उसंत नाही असे अनेक वारकरी पेरणी आटोपून रस्त्यात वारीत सहभागी व्हायचे. पंढरपूरच्या आषाढी वारीवर अनेक वेळा संकट आली. कधी मुसळधार पाऊस झाला तर कधी दुष्काळाच्या सावटाखाली वारी निघाली. पण या वारीत सहभागी झालेला वारकरी कधीच मागे हटला नाही. यावर्षी मात्र कोरोनाच्या संकटाने शेकडो वर्षाची परंपरा खंडित केली, असं म्हणतात की ऊन वारा पाऊस असं काहीही वारकऱ्यांना वारीपासून वेगळे करुच शकत नाही. मात्र कोरोना काळ बनून वारीवर आला आणि आषाढी पायी वारी रद्द झाली.
आषाढी वारी जेजुरीला पोहोचेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालेला असायचा त्यामुळे इथून पुढचा प्रवास मात्र पावसात सुरु व्हायचा. आतापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जिथे आंघोळीला आणि कपडे धुण्यासाठी पाणी मिळेल तिथे विसावणारा वारकरी आता मात्र आडोश्याच्या शोधात असायचा. अंगात पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी घातलेल्या या वारकऱ्यांच्या खांद्यावरचा हा भगवा पताका जणू आसमंतात रंग उधळत असायचा.
आता इथून पुढच्या प्रवासात मात्र वारकऱ्यांच्या अंगावर रेनकोट चढलेले असायचे. पावसाची एखादी मोठी सर आली की संपूर्ण वारी ओलीचिंब करुन जायची. पण या पावसाच्या सरीतून ही ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष कानावर पडला की पावसात थंडीने कुडकुडणाऱ्या या शरीरात ही आणखीनच उत्साह संचारायचा. वारीच्या मार्गावर कितीही मोठा पाऊस आला तरी ही वारकरी कधीच रस्त्यावरुन बाजूला हटले नाहीत. पावसाने रेनकोट घातलेल्या शरीरामध्ये प्रवेश केला असेल खरा. पण कापऱ्या आवाजातील ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष पावसालाही आपल्या तालावर नाचवत असायचा.
जेजुरीहून प्रस्थान ठेवलेल्या माऊलींच्या पालखीसाठी सगळ्यात कमी अंतर आजच्या टप्प्यातील असायचे. आता वारकऱ्यांचा मुक्काम हा वाल्मिकी ऋषीच्या वाल्हे गावात असायचा. माऊलीची पालखी ज्यावेळी हिरव्यागार डोंगररांगांनी नटलेल्या दौंडज खिंडीत पोहोचायची, त्यावेळी संपूर्ण खिंड वारकऱ्यांनी फुलून गेलेली असायची. जेजुरी ते वाल्हे पालखी मार्गातील हा एकमेव विसावा वारकऱ्यांना मिळायचा. याच ठिकाणी दुपारचे जेवण व्हायचे आणि क्षणभर पहुडलेले वारकरी पुन्हा वाल्ह्याच्या दिशेने कूच करायचे.
प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर जेजुरीहून बारा किलोमीटरचे अंतर कापून आल्यानंतर वारकरी वाल्मिकी ऋषीची संजीवन समाधी असलेल्या वाल्ह्यात पोहोचले असते. दरवर्षी दुपारी एक वाजेपर्यंत पालखी गावात मुक्कामाला पोहोचलेली असायची. पालखी वाल्यात येणार आहे म्हणून पंचक्रोशीतील सगळे लोक सकाळपासूनच पालखीतळावर गर्दी करायचे. गावामध्ये घरासमोर रांगोळी काढलेली असायच्या आणि पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक घरावर गुढी उभारली जायची. एरवी फक्त पाडव्याच्या दिवशी घरावर गुढी उभारणारे वाल्हेकर आज मात्र पालखीच्या स्वागतासाठी आपल्या घरावर गुढ्या उभा करायचे. पालखी मार्गातील एकूण प्रवासामध्ये वाल्हा हे एकमेव ठिकाण आहे जिथे घरावर गुढी उभा करुन पालखीचे स्वागत केलं जायचं. प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असती तर वाल्ह्यात प्रत्येक घरावर गुढी उभारुन स्वागत झालं असतं.
वाल्हे गावाच्या नावाची ही मोठी प्रसिद्ध आख्यायिका आहे. पुरातन काळी वाल्या कोळी याच गावाच्या परिसरात असलेल्या डोंगरात राहत असे आज ही वाल्हे गावाच्या माथ्यावर डोंगर रांगा पाहायला मिळतात याच डोंगररांगा म्हणजे वाल्या कोळ्याचे सात रांजण असायचे असे पूर्वीचे लोक सांगायचे. वाटमारी करणाऱ्या वाल्याला नारद मुलींचा अनुग्रह झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. याच वाल्मिकींनी पुढे रामायणासारखे महाकाव्य लिहिले याच वाल्मिकी ऋषीची संजीवन समाधी समोरुन माऊलींची पालखी जात असे. वाल्मिकी ऋषीमुळेच या गावाला वाल्हे असे नाव पडले आहे.
पूर्वी पालखी वाल्हे गावातून प्रदक्षिणा पूर्ण करायची मात्र याच काळात पाऊस असायचा, त्यामुळे चिखलात पालखी गावभर फिरवावी लागायची. त्यामुळे मागच्या दोन वर्षापासुन गावात प्रदक्षिणा घालण्याची प्रथा बंद झाली आहे. आता माऊलींची पालखी ही पालखी तळावर ठेवली जाते आणि तिथेच लोक दर्शनासाठी येतात. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम वाल्ह्यामध्ये झाला असता आणि पुन्हा पालखी सोहळ्याने उद्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असता.
क्रमशः
यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे