आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती आज माऊलींची पालखी सोपानकाकांच्या सासवडमध्ये विसावली असती आणि संपूर्ण कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता. त्यामुळे यंदा आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. यंदा आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती आज माऊलींची पालखी सोपानकाकांच्या सासवडमध्ये विसावली असती आणि संपूर्ण कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता.
काल पालखी मार्गातील सगळ्यात जास्त अंतर कापून चालत आलेले वारकरी आणि माऊलींची पालखी दिवेघाट पार करुन सासवड मुक्कामी आली असती. सासवड ही माऊलींचे बंधू सोपानकाकांची भूमी. याच ठिकाणी या या दोन बंधूंची बंधू भेट होते आणि माऊली सासवडमध्ये मुक्कामी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोपानकाका पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवायचे.
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया..
कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले सासवड म्हणजे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेला प्रदेश. आकाशाला भेदून ताठ मानेने उभ्या असलेल्या कऱ्हा काठच्या उंचच्या उंच डोंगर रांगा. हिरवेगार मळे आणि दाट झाडीत वसलेले सासवड हे वारकऱ्यांसाठी दोन दिवस विसाव्यांचे ठिकाण. एका दिवसात तब्बल तीस किलोमीटरचं अंतर चालून आलेले थकले भागलेले वारकरी याच सासवड मुक्कामी थांबत असायचे.
पुरंदरचा हा कऱ्हा पठार जशी आध्यात्मिक अधिष्ठान असलेली पवित्रभूमी आहे. त्याबरोबरच पावलो पावली दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या जिगरबाज लढवय्यांची ही भूमी आहे. बोलीभाषेपासून ते मराठी साहित्याची ज्यांनी जडणघडण केली त्या प्र के अत्रेचें गाव म्हणजे सासवड. पुरंदरच्या या कऱ्हा पठारात सात गड आणि नऊ घाट आहेत. वारी निघाली असती तर या गडाच्या पायथ्याशी आणि घाटाच्या माथ्याशी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली असती.
माऊलींची पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते तिथे पालखी तळ बनवण्यात आलेले आहेत. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गामध्ये अनेक पालखी तळ हे आता शहरांमध्ये किंवा गजबजलेल्या वस्तीमध्ये आल्याने अनेक वेळा भक्तांबरोबरच बऱ्याच वारकऱ्यांची ही अडचण होत असते. या पालखी मार्गातील सर्वात सुसज्ज आणि विस्तीर्ण असा पालखीतळ सासवडमध्ये बनवण्यात आलं आहे. या पालखी तळाला चहू बाजूंनी कंपाऊंड बनवण्यात आल्याने कितीही गर्दी झाली तरीही त्यावर नियंत्रण ठेवणं हे प्रशासनाला शक्य झालं आहे.
ब्रम्हांड पंढरी सोवळी हे खरी तरसी निर्धारे एक्या नामे सोपान सकळ सोवळा प्रचंड नुकसान बोले वितंड हरिवीण..
सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानकाकांची संजीवन समाधी आहे. सासवड मुक्कामी येणारे वारकरी हे सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असायचे. सासवडमध्ये माऊली आणि सोपानकाकांची भेट झाल्यानंतरच सोपानकाकांची पालखी प्रस्थान ठेवायची म्हणजे माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतरच सोपानकाकांची पालखी हे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवत असे. इथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे हे भावंडे पुढे वाखरी मध्येच एकत्र येत असतात.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. तो पुरंदर किल्ला सासवडपासून अवघ्या आठ किलोमीटरवर आहे. याच सासवडमध्ये विरबाजी पासलकरांची समाधी आहे. भोगवती आणि कऱ्हा नदीचा संगम याच भूमीत झाला. कऱ्हा काठावरील 52 सारदारांनीच पेशवाई वाढवली त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आज ही या ऐतिहासिक भूमीमध्ये पाहायला मिळतात.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आषाढी वारी निघाली नाही. मात्र प्रथेप्रमाणे आज सासवडमधून सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान झालं असतं. सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यामध्ये शंभरेक दिंड्या सहभागी झालेले असतात. सोपानकाकांच्या प्रस्थानावेळी सासवड पंचक्रोशीतील आबालवृद्ध एकत्र जमायचे. माऊलीच्या पालखी तळावरती भरलेला बाजार तर कोणत्याही जत्रेपेक्षा कमी नसायचा.
काल सासवडमध्ये पोहोचलेल्या माऊलींच्या पालखीचा आजचा दुसरा मुक्काम सुद्धा सासवडमध्ये झाला असता..
क्रमशः
आषाढी वारी | सासवडमध्ये ज्ञानोबा माऊली आणि सोपान काकांच्या पालखीची भेट | माझा विठ्ठल माझी वारी