22 March In History : इंदिरा गांधींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, देशात जनता कर्फ्यू; आज इतिहासात
22 March In History : कोविड-19 महासाथीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी 'जनता कर्फ्यू' लागू करण्यात आला होता. तर, आणीबाणीनंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर इंदिरा गांधी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आज 'जागतिक जल दिवस' आहे.

22 March In History : इतिहासात 22 मार्च या तारखेला अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. कोविड-19 महासाथीचा वाढता उद्रेक लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये या दिवशी 'जनता कर्फ्यू' लागू करण्याची घोषणा केली होती. या दिवशी पर्शियन सैन्याने मुघलांची राजधानी दिल्लीवर हल्ला केला होता. पर्शियाचा (आताचा इराण) सम्राट नादिर शाहने भारतावर हल्ला केला आणि कर्नालच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव झाला. यासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी आजच्या दिवशी, म्हणजेच 22 मार्च रोजी घडल्या.
जागतिक जल दिवस
1992 मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित पर्यावरण आणि विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जागतिक जल दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 22 मार्च 1993 रोजी पहिला ‘जागतिक जल दिन’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक जल दिवस साजरा करण्यात येतो. जगातील सर्व देशांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.
1739 : नादिर शाहने मुघलांचा पराभव करत दिल्ली काबिज केली
पर्शियाचा (आताचा इराण) सम्राट नादिर शाहने भारतावर हल्ला केला आणि कर्नालच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव झाला. मुघलांच्या पराभवानंतर नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली. जेव्हा नादिर शाह आपल्या लव लष्करासह लाल किल्ल्यावर पोहोचला तेव्हा येथे दंगल झाली आणि लोकांनी त्याच्या सैन्यातील अनेक सैनिकांना ठार केले. यामुळे संतप्त झालेल्या नादिरशहाने दिल्लीत 'संहार' करण्याचा आदेश दिला आणि त्याच्या सैन्याने आजच्या जुन्या दिल्लीतील अनेक भागात सामान्य लोकांना ठार मारले.
1894 : चितगाव बंडाचे नेतृत्व करणारे महान क्रांतिकारक सूर्य सेन यांचा जन्म.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारी मास्टर सूर्य सेन यांचा जन्मदिवस. त्यांनी इंडियन रिपब्लिक आर्मीची स्थापना केली होती. त्यांच्या नेतृत्वात चितगाव विद्रोह झाला.
1947 : शेवटचे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन भारतात दाखल
लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे ब्रिटिश प्रशासक होते. ब्रिटिश साम्राज्याचे शेवटचे व्हाइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. भारतीय स्वातंत्र्य कायदा ही त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेला महत्त्वाचा कायदा होता.
1969 : पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे उद्घाटन
भारतातील पेट्रोकेमिकल उद्योगाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 22 मार्च 1969 रोजी भारत सरकारचा उपक्रम म्हणून IPCL ची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयंत मेहता यांची या महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली.
1970 : मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना
हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पुण्यात स्थापना करण्यात आली. भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी ह्या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे, राष्टीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे, स्त्री-पुरुष-समानता निर्माण होणे ह्या निकडींतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे मंडळाच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पुढाकाराने मुस्लिम समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात आवाज उठवण्यात आला.
1977: इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाकडे राजीनामा सुपूर्द केला
आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसच्या या पराभवानंतर जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. मोररजी देसाई हे पंतप्रधान झाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
