Latur: लातूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, माना टाकणाऱ्या सोयाबीनला मिळाले जीवदान
Latur Rain Update: शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Latur Rain Update: तब्बल 25 दिवसांच्या खंडानंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण जुलै महिना पावसाचा असतांना, ऑगस्ट महिन्यातील 25 दिवस पाऊसच नव्हता. तर अती पावसाने जुलै महिन्यात पिके पिवळी पडली होती, मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या.अशा विचित्र स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्याला मध्यरात्रीच्या पावसाने दिला दिलासा मिळाला आहे.
लातूर शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगाच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले. काल दिवसभर वातावरणात प्रचंड उकडा जाणवत होता. मात्र मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाने वीस ते पंचवीस दिवसांपेक्षा जास्त उघडीप दिली होती. त्यामुळे सोयाबीन सारखी पिके पाऊस नसल्याने माना टाकत होते. परंतु या पावसामुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळाला आहे. एका तासापेक्षा जास्त काळ पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, पुढील दीड तास पावसाची सततधार सुरू होती. दरम्यान शहरातील अनेक भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता.
लातूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. खरिपातील मुख्य पीकच सोयाबीन समजले जाते. जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने एक दिवसही खंड न घेता दररोज हजेरी लावली होती. त्यात जिल्हाभरातील मोठे शेती क्षेत्र हे हलक्या प्रतीच्या जमिनीचे आहे. याच कारणामुळे जास्त झालेलं पाणी किंवा पावसाने उघडी दिल्यानंतर या जमिनीवरच्या पिकांचे नुकसान होते. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून सोयाबीनवर संकटाची मालीकाच सुरु आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पेरणी झाल्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागातील सोयाबीन वाहून गेले होते. कांही दिवसानंतर दमट वातावरणात गोगलगाईचे संकट येऊन सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महागड्या औषधांची फवारणी...
जुलै महिन्यात झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे सखल भागात पाणी साचून खरीपाची पिके पूर्णतः वाया गेली आहेत. ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश न मिळाल्याने उंचवट्यावरील आणि निचरा होणाऱ्या जमीनीतील पिकांचीही वाढ खुंटली. त्यानंतर येलो मोझॅकचे नवे संकट आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच नुकसान झाले. अशावेळी पाऊस उघडण्याची शेतकरी वाट पाहत होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस उघडला, तेंव्हा आठ दिवस बरे वाटले. या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीनवर पडणाऱ्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महागामोलाची औषधे घेऊन फवारणी केली.
50 टक्के पिकांचे नुकसान...
त्यानंतर पुन्हा पाऊस होईल, अशी अपेक्षा असताना जिल्हाभरात तीव्र ऊन पडत असल्याने पिकानी माना टाकल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई आणि 25 दिवसांपासून पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे 50 टक्के नुकसान झालेले आहे. आता प्रतीक्षा होती पावसाची, त्यातच मध्यरात्रीच्या पावसाने दिलासा दिला आहे. मध्यरात्री एक ते दीड तास पावसाने तुफान बॅटिंग करत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. येत्या काळात पावसाने अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा आता शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.