VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Bhaskar Jadhav Vs Ram Kadam : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता कक्षाचं काम बंद करण्यात आलं होतं असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला.

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे भास्कर जाधव भडकले आणि या दोन नेत्यांमध्ये विधानसभेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. जो व्यक्ती सभागृहात त्याच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देऊ शकत नाही त्याचा नामोल्लेख टाळावा असे संकेत असताना राम कदमांनी उद्धव ठाकरे यांचे नाव कसे काय घेतले असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला. त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राम कदम यांना उद्देशून 'बघतोच तुला आता' असा इशारा दिला.
भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता असा आरोप राम कदम यांनी केला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणाले की, राम कदम यांनी उद्धव ठाकरेंचे वारंवार नाव घेतलं. त्यांच्यावर वारंवार आरोप केले. ज्या प्रतिष्ठीत व्यक्तीला आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख करू नये असे संकेत आहे, तशी प्रथा आहे.
विरोधी पक्ष संख्येने कमी आहे. पण लोकशाहीचे संवर्धन करायचं असेल तर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी मिळावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. विरोधी सदस्यांना जास्त वेळ बोलण्याची संधी दिली गेली. त्या हिशोबाने आम्हालाही बोलण्याची संधी मिळावी असं ते म्हणाले.
बघतोच तुला आता, भास्कर जाधवांचा इशारा
भास्कर जाधव बोलताना भाजप आमदार राम कदम वारंवार उठून बोलत होते. जाधवांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाकडून अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी चिडलेल्या भास्कर जाधव यांनी राम कदम यांना उद्देशून 'बघतोच तुला आता' असा इशारा दिला
राम कदम यांनी जर काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्डवरून काढून टाकू असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तर आपण काही चुकीचं बोललो नाही, आपण राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोललो आणि तो आपला अधिकार असल्याचं राम कदम यांनी म्हटलं.
भास्कर जाधवांच्या नवीन सदस्यांना सूचना
भास्कर जाधव म्हणाले की, "नवीन सदस्यांना विनंतीवजा सूचना करायच्या आहेत. कधी कधी आपल्या नेत्यांची हांजीहांजी करतो, वाटत असेल की आपले नेते खूश होत असतील. पण समोरच्या पक्षाची प्रतीमा खराब होते. पक्षांतराचा अनुभव मलाही आला आहे. पण पक्ष सोडल्यानंतर मी त्या पक्षाबद्दल कधीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही. आपण सभागृहात काय करतो याचा लेखाजोगा बाहेर मांडला जातो."
माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते काढू नका. कारण आपल्यानंतरची पीढी ते वाचेल आणि आपण किती आदर्श निर्माण केले याचा अभ्यास करतील.
ही बातमी वाचा:























