(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेव्हा INS Vikrant साठी संजय राऊत, किरीट सोमय्या एकत्रितपणे राष्ट्रपतींना भेटत होते!
INS Vikrant सध्या वेगळ्याच कारणामुळे शिवसेना आणि भाजपच्या वादात कळीचा मुद्दा बनली आहे. कधीकाळी याच INS विक्रांतसाठी शिवसेना आणि भाजपचे नेते एकत्रितपणे राष्ट्रपती भवनाचे दरवाजेही ठोठावत होते.
नवी दिल्ली : आयएनएस विक्रांत...कधीकाळी भारताच्या पाकिस्तानविरोधातल्या युद्धाची साक्षीदार बनलेली युद्धनौका...तिचं म्युझियम होणं तर राहिलंच पण सध्या वेगळ्याच कारणामुळे ती शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वादात कळीचा मुद्दा बनली आहे. त्यावरुन ठिकठिकाणी आंदोलनाचीही ठिणगी उडत आहे. पण जे शिवसेना आणि भाजप या मुद्द्यावरुन आता एकमेकांशी भांडत आहेत कधीकाळी याच मुद्द्यावरुन ते एकत्रही होते. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत राष्ट्रपतींना भेटत होते आणि चक्क संजय राऊत आणि किरीट सोमय्या त्यावेळी एका शिष्टमंडळातही होते. किरीट सोमय्या यांच्या ट्विटर अकाऊंटवरचा 2013 चा हा फोटो अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी आज पुन्हा ट्वीट केला आहे.
#INSVikrant with @rautsanjay61 meeting His Excellency the President of India. Along with Anil Desai, Anant Gite and other Shiv Sena leaders....
— Adv.Vivekanand Gupta (@vivekanandg) April 8, 2022
The Hypocrisy of Naughty stands exposed. pic.twitter.com/D2V5VMFSbK
अर्थात त्यावेळी शिवसेना आणि भाजप या मुद्द्यावर असणं यात काही फारसं आश्चर्य नाही. कारण तसंही हे दोन पक्ष तीन दशकं युतीचा संसार करतच होते. पण आता आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या फंडचं नेमकं काय झालं यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
या निधीतून किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले, राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे. तर किरीट सोमय्या म्हणतात आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते हा त्यांचा सवाल.
पण संजय राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्वीटचा आधार घेत 58 कोटींचा आरोप आता 140 कोटी रुपयांवरही नेऊन ठेवला आहे.
मैने तो 58 करोड का हिसाब मांगा था...बात 140 करोड तक पहुंच गयी..
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2022
क्रोनोलिजी को समज लिजिये
प्यारे देश भक्तो...
गडबड ही गडबड हैं..@BJP4Maharashtra @uddhavthackeray @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PMOIndia @sanjayp_1 @RahulGandhi @dir_ed pic.twitter.com/o8MDQ3tHaG
त्यामुळे आता या सगळ्या आरोपांचं नेमकं काय होणार, किरीट सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर तर दाखल झाली आहे. पण ही एफआयआर ऐकीव माहितीच्या आधारावर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांतून आता पुढचं नाट्य कुठल्या दिशेने जाणार, पुढची लढाई कोर्टात लढली जाणार का, सोमय्यांना अटक होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून बाकी आहेत.
संबंधित बातम्या