Kirit Somaiya on INS Vikrant : आयएनएस विक्रांतचा निधी कुठं गेला, किरीट सोमय्यांनी म्हटले....
Kirit Somaiya on INS Vikrant : आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला निधी कुठं गेला, या प्रश्नावर किरीट सोमय्यांनी बगल दिली. त्यांनी या निधीचे काय झाले हे सांगण्याऐवजी संजय राऊत यांनी पुरावा द्यावा असे म्हटले.
Kirit Somaiya on INS Vikrant : आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी कुठं गेला, या प्रश्नावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर अखेर भाष्य केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी विषय काढल्यानंतर 10 वर्षानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने आरोप होत असल्याचे सांगत सोमय्या यांनी मूळ निधीच्या प्रश्नाला बगल दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्यावर ईडी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसह भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी सोमय्या यांना आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी निधी गेला कुठं असा प्रश्न केला होता. नेमका किती निधी जमवला, हा निधी कुठं गेला, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर सोमय्यांनी स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी म्हटले की, संजय राऊत यांनी हा आरोप केल्यामुळे प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी त्याबाबतचे पुरावे सादर करावे, असे प्रतिआव्हान किरीट सोमय्या यांनी दिले. मात्र, निधी कुठं गेला यावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. संजय राऊत यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. मात्र, त्याचे काय झाले हे त्यांनी आधी सांगावे असेही सोमय्या यांनी म्हटले.
आज, सकाळी पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर स्वत: चा बचाव केला. मात्र, त्यावेळीही त्यांनी आयएनएस विक्रांतचा निधी कुठं गेला, या प्रश्नाला बगल देत कारमध्ये बसून रवाना झाले होते. आयएनएस विक्रांतच्या निधीबाबत सोमय्यांनी अद्यापही थेटपणे भाष्य केले नाही.
पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हास्यास्पद
मुंबई पोलिसांनी दाखल केलेला माझ्याविरोधातील एफआयआर हा हास्यास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे ही तक्रार नोंदवली. त्यामध्ये कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्यावरील गुन्हा सिद्ध करावा असे आव्हान त्यांनी दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचे PMC बँक कनेक्शन? राऊतांच्या आरोपाने खळबळ
- INS Vikrant : शत्रूलाही धडकी भरवणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेचे नेमकं काय झालं? जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha