(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jyotiraditya Scindia : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे बुखारेस्टमध्ये दाखल, विद्यार्थ्यांशी साधला मराठीत संवाद
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दाखल झाले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
Jyotiraditya Scindia : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाटी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी खुद्द केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दाखल झाले आहेत. बुखारेस्टला पोहोचल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेबाबत रोमानियातील विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे ऑपरेशन गंगाचे विशेष विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्टमधून येथून दिल्लीला पोहोचले.
ज्योतिरादित्य शिंदे हे युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला पोहोचले आहेत. युक्रेनमधून निर्वासन ऑपरेशनच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने चार विशेष दूत नियुक्त केले आहेत, त्यापैकी एक ज्योतिरादित्य शिंदे एक आहेत. बुखारेस्टला पोहोचल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळावर आपल्या विमानाची वाट पाहत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली. बुखारेस्ट विमानतळावर थांबवलेल्या महाराष्ट्रातील काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते विमानतळावर थांबलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी एक विद्यार्थीनी आपण महाराष्ट्रातील असल्याचं सांगते. यानंतर अतिशय आपुलकीने ज्योतिरादित्य शिंदे हे या तरुणीसोबत मराठीत संवाद साधताना दिसले.
Civil Aviation Minister @JM_Scindia provides a healing touch to medical students from Maharashtra waiting at the Bucharest airport ! Speaks in Marathi, reassures all assistance ! This is how crises are handled by @narendramodi Govt ! #OperationGanga ! pic.twitter.com/jse1HtRj0L
— Dr. VINAY Sahasrabuddhe (@Vinay1011) March 2, 2022
रात्री विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बारतीय नागरिकांचे स्वागत केले. दरम्यान, युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. ऑपरेशन गंगा अंतर्गत तेथे बरीच विमाने येत आहेत. आम्ही 4 मंत्र्यांनाही त्याठिकाणी पाठवले आहे. त्यामुळे वेगाने बचावकार्य सुरु असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह हे सध्या पोलंडमध्ये आहेत. दिल्लीला परतण्यापूर्वी त्यांनी पोलंडमधील रॅझो विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हंगेरीतील बुडापेस्ट विमानतळावर पोहोचून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, भारत आपल्या नागरिकांना युक्रेनमधून वेगाने बाहेर काढत आहे. मंगळवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, सर्व भारतीय नागरिकांनी किव्ह सोडले आहेत. याआधी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांना ताबडतोब कोणत्याही माध्यमाने कि्ह सोडण्याची सूचना केली होती.
दुर्दैवाने, युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात मंगळवारी झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. गोळीबारात ठार झालेला भारतीय युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.
महत्त्वाच्या बातम्या: