Joe Biden on Russia Ukraine: युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकन सैन्य? बायडन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
President Joe Biden Speech Highlights : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन संसदेला संबोधित करताना रशियाला इशारा दिला. जाणून घ्या त्यांच्या भाषणातील मुद्दे
Russia Ukraine War President Joe Biden Speech Highlights : रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या 'स्टेट ऑफ द युनियन'ला संबोधित करताना त्यांनी रशियावर जोरदार टीका केली. युक्रेनवर हल्ला करून पुतीन यांनी घोडचूक केली आहे. रशियाची आणखी आर्थिक कोंडी करणार असून अमेरिकेची हवाई हद्द रशियासाठी बंद करण्यात आल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे. युक्रेनवर अमेरिकेचे सैन्य उतरवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. आपल्या भाषणात जो बायडन यांनी युक्रेनचे कौतुक केले. रशियाने युक्रेनकडून एवढ्या मोठ्या प्रतिकाराची अपेक्षाच केली नसणार असेही बायडन यांनी म्हटले.
>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
रशियासाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद
रशियाने पुकारलेल्या युद्धाची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आम्ही रशियावर आर्थिक निर्बंध लागू करत आहोत असे बायडन यांनी सांगितले. फक्त अमेरिकाच नव्हे तर जगातील इतर अनेक देश युक्रेनसोबत उभे असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने रशियाची हवाई हद्द बंद केली असल्याची घोषणा त्यांनी केली.
युक्रेनला एक अब्ज डॉलरची मदत
युक्रेनला अमेरिका एक अब्ज डॉलर्सची मदत देणार असल्याची घोषणा बायडन यांनी केली.
अमेरिकन सैन्याच्या मदतीचे काय?
बायडन म्हणाले की, आम्ही नाटो देशांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. युक्रेनला मदत करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. मात्र, बायडन यांनी स्पष्ट केले की आमचे सैन्य युक्रेन-रशियन युद्धात सहभागी होणार नाही.
बायडन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल
बायडन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्ला बोल केला. पुतीन सध्या जगात एकटे पडले आहेत. यापूर्वी ते कधीही इतके एकटे पडले नव्हते. युरोपियन युनियनचे सुमारे 27 देश सध्या युक्रेनसोबत असल्याचेही बायडन यांनी सांगितले.
हुकूमशाहांना धडा शिकवणे गरजेचे
बायडन यांनी म्हटले की, युरोपियन युनियन एकजूट आहे. आम्हाला युक्रेनच्या लोकांचा अभिमान आहे. आता हुकूमशहाला त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा करणे खूप महत्वाचे आहे. पुतिन यांनी युक्रेनवर जाणूनबुजून हल्ला केला आहे. रशियावर लागू करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे तो आणखी कमकुवत होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
बायडन यांनी संबोधित केलेले 'स्टेट ऑफ द युनियन' म्हणजे काय?
'स्टेट ऑफ द युनियन' म्हणजे अमेरिकेची संसद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संसदेला संबोधित करतात. प्रत्येक नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भाषणात सद्य परिस्थिती बाबत भाष्य करतात.