(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parliament Monsoon Session : 29 आणि 30 जुलै रोजी विरोधी पक्षांची फौज मणिपूरमध्ये, परिस्थितीचा घेणार आढावा
Parliament Monsoon Session : 'इंडिया'च्या आघाडी पक्षाचे शिष्टमंडळ हिंसाग्रस्त असलेल्या मणिपूर राज्याचा दौरा करणार आहेत.
Parliament Monsoon Session : देशात सध्या मणिपूर (Manipur) या एकाच प्रश्नाने खळबळ माजली आहे. संसदेच्या आणि राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी (Opposition) सत्ताधारी पक्षांना या मुद्द्यावरुन चांगलाच घेरलं आहे. त्यातच आता 'इंडिया'मध्ये सामील असणाऱ्या विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ मणिपूरचा दौरा करणार आहे. 29 आणि 30 जुलै रोजी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरमध्ये दाखल होणार आहे. तसेच आता हा मुद्दा संसदेत (Parliament) मांडण्यासाठी विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर दबाब आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मंगळवारी सभागृहात या मुद्द्यावर बोलत असताना त्यांचा माईक बंद करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तसेच जेव्हापासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. तेव्हापासून म्हणजेच 20 जुलैपासून मणिपूरच्या मुद्द्यावर एकाही प्रश्नाला संसदेत उत्तर दिले गेले नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ सुरु आहे. या चर्चेसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजू तयार आहेत. मात्र यावर सरकारकडून कोण उत्तर देणार यावर सध्या संसदेत संघर्ष सुरु आहे. यावर सत्ताधारी पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांनीच संसदेत येऊन उत्तर देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर यावर सत्ताधारी पक्षाकडून अमित शाह बोलणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य केलं नाही तर विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची रणनिती आखण्यात आली आहे.
विरोधकांचं संसद भवन परिसरात आंदोलन
दरम्यान, याच मुद्द्यावरुन विरोधकांनी गुरुवार (27 जुलै) रोजी संसद भवन परिसरात काळे कपडे घालून आंदोलन केलं आहे. यावेळी बोलतांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं की, सभागृह चालू आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करावं अशी मागणी आम्ही करत आहोत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमध्ये राजकीय भाषण देत आहेत आणि निवडणुकीवर भाष्य करत आहेत. जर ते राजस्थानात जाऊ शकतात तर अर्ध्या तासासाठी संसदेत नाही येऊ शकत का? असा सवाल देखील खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचा अपमान करत आहेत असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.