LPG Cylinder : INDIA आघाडीच्या फक्त दोन बैठका अन्.., सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
Mamata Banerjee : विरोधकांच्या इंडिया आघाडीचा धसका केंद्रातील मोदी सरकारने घेतला असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
नवी दिल्ली: घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Price) किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचा धसका घेतल्याने केंद्राने गॅसच्या किमती कमी केल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटलं आहे. विरोधी गटाच्या केवल दोन बैठका आणि गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी... असं ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
तृणमूल कांग्रेस (TMC) च्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आतापर्यंत इंडिया आघाडीच्या केवळ दोनच बैठका झाल्या, पण सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हाच आहे INDIA चा दम.
ममता बॅनर्जी यांची ही पोस्ट आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि INDIA आघाडीचा भाग असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेअर केली आहे.
Till now, only TWO meetings have been held in the past TWO months by the INDIA alliance and today, we see that LPG prices have gone down by Rs. 200.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 29, 2023
ये है #INDIA का दम!
राखी पोर्णिमेच्या दिवसापासून देशातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी केल्या जातील, मोदी सरकारने देशभरातील महिलांना राखी पोर्णिमेची भेट दिल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज जाहीर केलं होतं. त्यावरून आता ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
INDIA आघाडीमध्ये कोणत्या पक्षांचा समावेश आहे?
विरोधकांच्या INDIA आघाडीमध्ये सध्या 26 पक्षांचा समावेश आहे. या आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाटणा येथे झाली. त्याच वेळी काँग्रेसने कर्नाटकातील बंगळुरु येथे दुसरी बैठक आयोजित केली होती. 'इंडिया'मध्ये टीएमसी, आप, काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि जेएमएम यासह अनेक पक्षांचा समावेश आहे.
तिसरी बैठक मुंबईत होणार
INDIA आघाडीची तिसरी बैठक गुरुवारी (31 ऑगस्ट) आणि शुक्रवारी (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) पराभव करण्यासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्ष सातत्याने रणनीती आखत आहेत.
ही बातमी वाचा: