(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BCG लसीचा वापर वयोवृद्धांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी, ICMR चे नवे संशोधन
ICMR आणि NIRT च्या एका संशोधकांच्या गटाने असा निष्कर्ष काढला आहे की क्षयरोगावर उपयुक्त असलेल्या बीसीजी (BCG) लसीचा वापराने वयोवृद्ध लोकांत रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचा वापर कोरोनाविरुध्द लढण्यास होऊ शकतो.
नवी दिल्ली: क्षयरोगावर प्रभावी असलेल्या बीसीजी (BCG) म्हणजे Bacille Calmette-Guerin च्या लसीबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने एक नवे संशोधन समोर आणले आहे. त्यात म्हटलंय की BCG लसीचा वापर वृध्द व्यक्तींना कोरोनाचा सामना करण्यासाठी होऊ शकतो. BCG या लसीचा वापर 40 वर्षावरील लोकांमध्ये क्षयरोगाचे निदान करण्यासाठी होतो. यामुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडी आणि टी- सेल्समध्ये वाढ होते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या गोष्टीचा वापर आता वयोवृध्द लोकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी होऊ शकतो असे ICMR ने म्हटले आहे. याबाबत ICMR ने राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था (NIRT) च्या काही संशोधकांच्या सहाय्याने संशोधन केले. हे संशोधन नथेला पवन कुमार याच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या संशोधनाची पुर्नपडताळणी अजून व्हायची आहे. पण या संशोधनात BCG लसीमुळे 60 ते 80 वयोगटातील मनुष्याच्या शरीरीत टी-सेल, बी-सेल आणि अँटीबॉडीज् निर्माण होतात का यावर भर देण्यात आला होता. या संशोधनासाठी 86 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 54 लोकांवर BCG च्या लसीचा वापर करण्यात आला आणि उरलेल्या लोकांना प्लॅसेबो ही लस देण्यात आली होती. BCG लस घेतलेल्यांपैकी 33 लोकांत म्हणजे 61 टक्के लोकांत याचा परिणाम दिसून आला. त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाल्याचे दिसून आले.
यातून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की BCG ची लस ही कोरोनाच्या संक्रमणाविरोधात लढण्यास उपयोगी पडू शकेल. त्याचा मुख्यत: फायदा हा वयोवृध्द लोकांना होण्याची शक्यता आहे.
BCG लसीचा परिणाम म्हणज शरीरात अनुकूल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या नव्या सेल्स निर्माण होतात आणि त्या अँटीबॉडीची निर्मितीही करतात असे एका संशोधकांनी त्यांच्या अहवालात नमुद केले आहे.
जगभरात कोरोनाच्या लसीवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु असताना ICMR चे हे संशोधन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या संशोधनाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. भारतात जगाच्या तुलनेत कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. हा परिणाम BCG च्या लसीचा असू शकतो का हा अभ्यासाचा विषय असल्याचं एका संशोधकांनी सांगितले आहे.