Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Sudhir Mungantiwar on Eknath Shinde मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या सरकारच्या स्थापनेत त्यांच्या बाजूनं अडथळा नसेल, असं स्पष्ट केलं. माझी भूमिका काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना काल फोन करुन निर्णय कळवल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्री म्हणून जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देऊ, असं सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या सरकारच्या स्थापनेबाबतच्या बैठकीसाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या चर्चेवर विराम पडावा म्हणून एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून आपली भूमिका व्यक्त केली होती. अमित शाह यांनी जे सांगितले ते मान्य आहे. मात्र, वेगळी चर्चा सुरु झाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असं मुनगंटीवार म्हणाले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी अर्थशास्त्राऐवजी ह्रदयशास्त्रानं सरकार चालवलं अशा शब्दात मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. ही शिवसेना मोठ्या मनाची असून ती शिवसेना कोत्यामनाची असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सुधीर मुनंगटीवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी पराभवाचं विश्लेषण करण्यात वेळ घालवावा, असं म्हटलं. आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, आता चर्चा समाप्त होईल, असं मुनगंटीवार म्हणाले.
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा
एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात भूमिका जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी भाजपचा जो उमेदवार असेल त्या नेत्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दिल्ली जाणार असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली.
अजित पवार यांनी यापूर्वीच भाजपला पाठिंबा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर बातम्या :