Gyanvapi Survey : ज्ञानव्यापीचं 3D मॅपिंग, मशिदीच्या तळघरात मंदिर शैलीतील 20 कपाटं; मुस्लिम पक्षाकडून सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण तिसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान, ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुस्लिम पक्षाकडून देण्यात आला आहे.
Gyanvapi Mosque ASI Survey : वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानव्यापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरात सध्या पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. ज्ञानव्यापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) तळघराचा सर्व्हे करण्यात येत आहे. ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिर शैलीतील 20 कपाटं सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. हिंदू पक्षाच्या वकिलांनी शनिवारी दावा केला होता की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाला सर्वेक्षणादरम्यान मूर्तीचे अवशेष आणि काही तुटलेल्या कलाकृती सापडल्या आहेत. दरम्यान, ASI कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मंदिर शैलीतील 20 हून अधिक कपाटं
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) तिसऱ्या दिवशी ज्ञानवापीच्या तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण केलं. घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान पुरातत्व विभागाला गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. यामध्ये मंदिर शैलीतील 20 हून अधिक अलमिरा म्हणजेच भिंतीत बांधलेली कपाटं सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) ज्ञानव्यापीची रचना आणि भिंतीचं थ्री-डी मॅपिंग करण्यात आलं. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने इशारा दिला आहे की, जर मशिदीत हिंदू धर्मासंबंधित कलाकृती किंवा चिन्हं सापडल्याची अफवा पसरवली गेली तर ते संपूर्ण सर्वेक्षणावर बहिष्कार टाकतील.
ज्ञानवापीच्या इमारतीचं थ्रीडी मॅपिंग
संपूर्ण ज्ञानवापी इमारत एकाच वेळी पाहण्यासाठी सॅटेलाईटद्वारे थ्रीडी मॅपिंग केलं जात आहे. रविवारी झालेल्या सर्वेक्षणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) 58 कर्मचारी, हिंदू पक्षाचे 8 जण आणि मुस्लिम पक्षाचे 3 जण उपस्थित होते. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) 2 सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करावा लागेल.
तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण 4 ऑगस्टपासून सुरू झालं आहे. यापूर्वी 24 जुलै रोजी सर्वेक्षण करण्यात आले होते. एएसआय याला पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण मानत आहे. त्यानुसार आतापर्यंत चार दिवसांचं सर्वेक्षण करण्यात झालं आहे. ज्ञानवापीचे तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. एएसआयने व्यास तळघरातील भिंतींचे थ्रीडी फोटोग्राफी, स्कॅनिंग केलं.
ज्ञानवापी येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चं चौथ्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. चौथ्या दिवशी, एएसआय टीमला घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळल्या आहे. त्यांची फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. या सभामंडपात आतापर्यंत 20 हून अधिक भिंतीमध्ये बनवलेली कपाटं आढळली आहेत. त्यांची रचना आणि त्यांच्या सभोवतालचे थ्री-डी मॅपिंग देखील करण्यात आलं.